बार्शी : बार्शी (जि. सोलापूर) शहरातील मनगिरे मळा या ठिकाणी असलेल्या कागदी पुठ्याच्या गोडाऊनला पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. यात राजेश रामावतार साहू (वय ४०) याचा जागीच होरपळून मृत्यू झाला तर तिघेजण जखमी झाले आहेत.
या बाबत अधिक माहिती अशी की, मनगिरे मळा येथे उत्तरप्रदेश येथून आलेल्या साहू परिवाराचा पुठ्याचा व्यवसाय होता. पुठ्ठा ठेवण्यासाठी पत्र्याचे मोठे शेड मारून गोडाऊन तयार केले होते व यातच शाहू परिवार राहत होते. शुक्रवारी (ता.५) पहाटे अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास अचानक शॉर्टसर्किटने पुठ्यांना आग लागली. संपूर्ण गोडाऊन पुठ्यांनी भरलेले असल्याने क्षणार्धात संपूर्ण गोडाऊन आगीच्या भक्षस्थानी पडले.
यावेळी घरामध्ये राजेश रामावतार साहू व त्याची पत्नी आरती राजेश साहू हे दोघे होते. तर इतर दोन सदस्य लहान मुलाला घेऊन वॉचमन म्हणून कामावर गेलेले होते. आग अचानक भडकल्याने घरातील दोन्ही सदस्यांना बाहेर पडता आले नाही. राजेश याचा बेडरूममध्ये जागेवरच होरपळून मृत्यू झाला. त्याचा अक्षरश: कोळसा झाला होता. तर आरती बाथरूम मध्ये जखमी अवस्थेत पडलेली होती. आग लागल्यानंतर गोडाऊन समोरील विनायक केसकर व भाऊबली नगरकर व आवदेश रामराव साहू हे आग विझवण्याचा प्रयत्न करत असतानाच गॅस सिलिंडरचा मोठा स्फोट झाल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत.
दरम्यान पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास या गोडाऊनला आग लागल्याचे समजताच नगरपालिका विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रावसाहेब मनगिरे, अजित कुंकुलोळ यांनी घटनास्थळी धाव घेत मदत यंत्रणा राबवली. परिसरातील नागरिकांच्या मदतीने गोडाऊनचे पत्रे काढून आग विसवण्यास मदत केली. जखमींवर उस्मानाबाद येथे उपचार सुरू आहेत.