संताजी शिंदे
सोलापूर : लागलेली आग विझवण्यासाठी धावणाºया अग्निशामक दलाच्या गाड्या, सध्या शहरातील कोरोनाग्रस्त भागात विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी फवारणी करीत असल्याचे दिसून येत आहे. दररोज ३० ते ३५ गाड्यांमार्फत सोडियम हायड्रोक्लोराईड मिश्रित पाण्याची फवारणी करून लोकांना कोरोनाच्या विषाणूपासून संरक्षण देण्याचा प्रयत्न करीत आहेत.
एरव्ही आग विझवण्यासाठी जीव धोक्यात घालून काम करणारे हे जवान, सध्या कोरोनासारख्या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लढत आहेत. दि. १२ एप्रिल रोजी तेलंगी पाच्छापेठ येथे मृत झालेल्या दुकानदाराचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता. तेव्हापासून हायड्रोक्लोराईड मिश्रित पाण्याच्या फवारणीला सुरुवात झाली. दिवसेंदिवस शहरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत गेली. दररोज पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. ज्या भागात रुग्ण आढळतात त्या ठिकाणी दलाच्या गाडीला बोलावून फवारणी केली जात आहे.
सध्या तीन गाड्या सातत्याने फवारणीसाठी धावत आहेत. मलेरिया विभागाकडून देण्यात आलेल्या सोडियम हायड्रोक्लोराईडचे मिश्रण केले जात आहे. पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेला परिसर तेथे फवारणी करण्यासाठी नगरसेवक दररोज अग्निशामक दलास संपर्क साधून गाडी पाठवून देण्यास सांगत आहेत. जवान फवारणी करीत असतात आणि नगरसेवक किंवा स्थानिक नेते मंडळी मात्र स्वत:च्या खिशातून पैसे देऊन गाडी मागवल्याच्या आविर्भावात फिरत असतात. इथे फवारा तिथे मारा, असे सांगत कर्मचाºयांवर अधिकार गाजवत असतात. एका नगरसेवकाने कहर केला, मी मोटरसायकलवर जात असताना आमच्या भागात माझ्या पाठीमागे सायरन वाजत अग्निशामक दलाची गाडी घेऊन या, असा हट्टही केला होता. जवानांना आम्ही सांगेल त्याच ठिकाणी फवारणी करा, असे म्हणत रुबाब दाखवणारे नगरसेवकही पाहावयास मिळत आहेत.
दररोज एकाच भागात फवारणी करण्याचा आग्रह- काही भागात दररोज एकाच भागात फवारणी करण्यासाठी आग्रह धरला जात आहे. वास्तविक पाहता सोडियम हायड्रोक्लोराईड फवारणी जिथे रुग्ण आढळतो त्या घरावर किंवा आजूबाजूला केली पाहिजे. असे असताना सर्व परिसरात फवारणी केली जात आहे. वास्तविक पाहता त्वचेचे रोग होतात म्हणून मुंबई व पुणे येथे अशा फवारण्या बंद केल्या आहेत.
दररोज सोडियम हायड्रोक्लोराईड मिश्रित पाण्याची फवारणी केली जात आहे. नगरसेवकांच्या मागणीनुसार गाड्या पाठवत आहोत. संकट कोणतेही असो अग्निशामक दलाचे जवान सतत लोकांच्या मदतीसाठी सज्ज असतात.-केदार आवटे, अधीक्षक,