पाच झोन समित्या भाजपकडे, दोन शिवसेनेला, एक विरोधकांना देणार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2019 10:44 AM2019-05-07T10:44:05+5:302019-05-07T10:46:43+5:30
सोलापूर महानगरपालिकेतील फॉर्म्युला : पालकमंत्री देशमुख, महेश कोठे यांच्यात चर्चा
सोलापूर : महापालिकेतील सात विषय समित्यांपैकी चार समित्या भाजपकडे तर तीन समित्या शिवसेनेला देण्यावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. शिवाय झोन समित्यांचा विषय याच महिन्यात मार्गी लावून आठ झोन समित्यांपैकी पाच झोन समित्या भाजपकडे ठेवण्यात येणार आहेत. दोन शिवसेनेकडे तर एक समिती काँग्रेस किंवा एमआयएमला सोडण्याचा निर्णय पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश कोठे यांनी घेतला आहे.
लोकसभा निवडणुकीवेळी महापालिकेच्या सत्ताकारणात भाजप-शिवसेनेची युती झाली आहे. सत्तेतील वाट्याबाबत भाजपकडून पालकमंत्री देशमुख तर शिवसेनेकडून महेश कोठे निर्णय घेत आहेत.
विषय समित्यांच्या सदस्य निवडी २० एप्रिल रोजी झाल्या आहेत. १६ किंवा १७ मे रोजी विषय समित्यांच्या सभापती निवडी होण्याची शक्यता आहे. यापार्श्वभूमीवर देशमुख आणि कोठे यांनी रविवारी चर्चा केली. यावेळी सभागृह नेते संजय कोळी, नगरसेवक शिवानंद पाटील, राजकुमार हंचाटे, प्रथमेश कोठे आदी उपस्थित होते.
सात समित्यांपैकी महिला व बालकल्याण, कामगार व समाजकल्याण आणि विधी समिती शिवसेनेला देण्यावर शिक्कामोर्तब झाले. झोन समित्यांचा विषय महापौरांकडे प्रलंबित आहे. हा विषय लवकर मार्गी लावण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. एकूण आठ झोन समित्यांपैकी पाच समित्यांचे सभापती भाजपचे असतील. समित्या गठीत झाल्यानंतर कोणती समिती कोणाकडे राहील याचा निर्णय घेण्यात येणार आहे; मात्र मे अखेर झोन समित्यांचा विषय मार्गी लावण्यासाठी दोन्ही पक्षांनी प्रयत्न करण्याचा निर्णय झाला.
विरोधी पक्षनेतेपद सेनेकडेच राहणार
- शिवसेनेने तीन समित्यांसह उपमहापौर पदावरही दावा केला आहे. यादरम्यान विरोधी पक्षनेतेपद शिवसेनेकडेच ठेवण्यात येणार आहे. याबाबत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश कोठे म्हणाले, सेना-भाजपची युती ही लेखी नव्हे तर तोंडी युती आहे. निवडणूक लढविता युती झाली असती तर कायद्यानुसार विभागीय आयुक्तांकडे त्याची नोंद झाली असती. आता निवडणुकीनंतर ते करता येणार नाही. पण आम्ही विषय समित्या, झोन समित्यांसाठी युती करीत आहोत. ठराविक विषयांवर केलेली युती ही वेगळी गोष्ट आहे. विरोधी पक्षनेतेपद शिवसेनेकडेच राहील. त्यावर विरोधकांना संधी देण्याचा विचार नाही.