शंभुलिंग अकतनाळ
चपळगाव : अक्कलकोट तालुक्यासाठी वरदायिनी ठरलेले कुरनूरचे धरण आता दुर्मिळ पक्ष्यांच्या वास्तव्यासाठी पोषक ठरु लागले आहे. धरणावर या मोसमात एशियन पाईड स्टर्लिंग, डोमेसियल क्रेन, आॅस्प्रे या जातीच्या दुर्मिळ परदेशी पक्ष्यांबरोबरच तब्बल ९० विविध प्रजातींचा मेळा जमला आहे. पक्षी निरीक्षकांना ही पर्वणी लाभली आहे.
सोलापूर जिल्ह्यात कुरनूर धरणावर या पक्ष्यांचे मोठे वास्तव्य झाल्याचे नेचर कॉन्झर्व्हेशनचे शिवानंद हिरेमठ यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. नेचर कॉन्झर्वेशन सर्कल, सोलापूर या निसर्ग संवर्धन करणाºया संस्थेतर्फे बर्डमॅन डॉ. सलीम अली यांच्या जयंतीचे औचित्य साधून मंगळवारी कुरनूर धरण क्षेत्रामध्ये पक्षीनिरीक्षण उपक्रम राबविला़ जे पक्षी आपल्याला शहरामध्ये आढळत नाहीत असे कवडी मैना, करड्या डोक्याची मैना, गुलाबी मैना, गुलाबी चटक, माळ मुनिया, लालमुनिया, काळ्या डोक्याची मनोली, पांढºया भुवयाची बुलबुल, हळद्या, पाणकावळा, धोबी, नदी सुरय अशा अनेक दुर्मिळ पक्ष्यांचे दर्शन कुरनूर धरण क्षेत्रामध्ये झाले. सोलापुरातील होटगी, हिप्परगा या तलावांपेक्षाही कुरनूर धरण परिक्षेत्राचे आवार मोठे असल्याने या येथे मुबलक प्रमाणात जैवविविधता आढळते. त्यामुळे हा भाग सुजलाम् सुफलाम् असल्याने हे दुर्मिळ पक्षी आढळून आले आहेत.
नेचर कॉन्झर्व्हेशनच्या सदस्यांनी केलेल्या पक्षी निरीक्षणात जवळपास ९० प्रकारच्या पक्ष्यांचे दर्शन झाले. आॅस्प्रे हा शिकारी पक्षीदेखील कुरनूर धरणावर पोहोचलाय. त्याचे आवडते खाद्य मासे आहे. हा एक विश्वव्यापी पक्षी असून, याचे प्रजनन केवळ अमेरिकेतील भौगोलिक परिस्थितीत होते. वास्तविक हा पक्षी आपल्याकडे जास्त प्रमाणात आढळत नाही. या अगोदर सलग तीन वर्षे कुरनूर धरणावर आढळलेला आहे आणि यावर्षी परत आलेला असून, याचे वास्तव्य या परिसरात वाढत आहे. या पार्श्वभूमीवर येथे पक्षीनिरीक्षण केंद्र व्हावे, अशी अपेक्षा पक्षी निरीक्षकांकडून होऊ लागली आहे.
या कारणामुळे होतेय पक्ष्यांचे आगमन- धरण परिसरातील जुन्या बावकरवाडी गावातील पडकी घरे, आजूबाजूच्या शेतात मिळणारे खाद्य, धरणाची पोषक अशी भौगोलिक परिस्थिती आणि व्याप्त स्वरूपातील मैदानी प्रदेशामुळे कुरनूरचे धरण काही वर्षात दुर्मिळ पक्ष्यांसह नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या पक्ष्यांचे माहेरघर बनत चालले आहे.
यांनी केले पक्षी निरीक्षण- यावेळी नेचर कॉन्झर्वेशनचे भरत छेडा, शिवानंद हिरेमठ, नीलकंठ पाटील, सचिन पाटील, रत्नाकर हिरेमठ, विनायक दुधगी, संतोष धाकपाडे, अजित चौहान, तरुण जोशी, प्रतीक तलवाड, दाजी क्षीरसागर, सोमानंद डोके, महादेव कुंभार, अमोल मिस्कीन, बसवराज बिराजदार, आदित्य घाडगे, विनय गोटे, शुभम बाबानगरे, गणेश बिराजदार, रत्नाकर हिरेमठ, अजय हिरेमठ, सिद्धांत चौहान, राकेश धाकपाडे, माही जोशी, रुद्रप्रताप चौहान, प्राजक्ता धनशेट्टी इ. या सदस्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला.