जलाशयाची पाणीपातळी झपाट्याने खालावत असल्याने लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांची ऐन उन्हाळ्यात पिके वाचविण्यासाठी अक्षरश: धावपळ सुरु झाली आहे.
गतवर्षी पुणे जिल्हा व परिसर तसेच भीमा खोऱ्यात झालेल्या जोरदार पावसाच्या बळावर उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरून ओव्हरफ्लो झाले होते.
त्यामुळे शेतकरी उन्हाळ्यात पाणी कमी पडणार नाही, या भरवशावर निर्धास्त होता. परंतु सोलापूरला पिण्यासाठी भीमा नदीतून पाणी सोडल्याने पुन्हा एकदा पाण्याचे संकट सुरू झाले आहे. मोठ्या प्रमाणावर पाणी सोडल्याने उजनी जलाशयाचा पाणीसाठा सध्या १४ टक्क्यांवर आला आहे.
पाणीसाठा वरचेवर झपाट्याने कमी होत असल्याने लाभक्षेत्रातील, सखल भागातील शेतकऱ्यांची पिके वाचविण्यासाठी मोठी धावपळ सुरू झाली आहे. पाईप, केबल, मोटारी पाणी पुढे जाईल तसतसे वाढवावे लागत आहे. वाढत्या उन्हाच्या तडाख्याने पाण्याचे बाष्पीभवनही मोठ्या प्रमाणात होत आहे. कोणत्याही परिस्थितीत जलाशयाचा पाणीसाठा मायनसमध्ये जाणार असल्याने शेतकरी हादरून गेला आहे. आगामी काळात पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागणार आहे.
----
उजनी धरणात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा होता, परंतु दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी पाण्याचे योग्य नियोजन न झाल्याने पाण्याचे तीनतेरा वाजल्याचे दिसत आहे.
- हरिश्चंद्र खाटमोडे,केतूर
----
पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी धरणग्रस्त इंदापूर तालुक्याला उजनी जलाशयातील पाच टीएमसी पाणी राखीव ठेवले आहे. त्याप्रमाणेच करमाळा तालुक्यातील धरणग्रस्तांसाठी पाणी राखीव ठेवणे गरजेचे झाले आहे.
-
ॲड. अजित विघ्ने, केत्तूर
---