सोलापूर: लाखो रुपयांची रक्कम गुंतवलेली फायनान्स बंद करून गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची आॅनलाईन तक्रार शिवानंद बागलकोटी यांनी नोंदवली असून, या प्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.
सायंकाळी गुंतवणूकदारांच्या जमावाने पोलिसांकडे आपलं गाºहाणं मांडून गुंतवणूक केलेल्या रकमांच्या पावत्या सादर केल्या.या प्रकरणी फिर्याद देणारे शिवानंद बागलकोटी (१८५, गुरुवार पेठ, सोलापूर) यांच्या म्हणण्यानुसार टिळक चौकात गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या ओंकार फायनान्समध्ये गेल्या दहा वर्षांपासून आॅनलाईन व्यवहाराद्वारे अभिजित दायमा नामक फायनान्सचे मालक यांच्याकडे वेळोवेळी गुंतवणूक केली. ती ११ लाख ७८ रुपये आहे. फिक्स डिपॉजिटपोटी आपणास व्याज मिळत होते. मार्च २०१९ पर्यंत हे सुरळीत चालले होते.
मात्र गेल्या पाच-सहा दिवसात संबंधित व्यक्तीला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी फोन उचलला नाही. शिवाय टिळक चौक येथे कार्यरत असलेले फायनान्सचे कार्यालयही बंद करण्यात आले आहे. आपल्यासह अनेक गुंतवणूकदारांची जवळपास ५० कोटींची फसवणूक झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
यासंबंधी पोलीस निरीक्षक बोंदर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी संबंधित तक्रार आपणास प्राप्त झाली आहे. गुंतवणूक केलेल्या अनेकांकडून पावत्या जमा करून घेण्याचे काम सुरू आहे. फसवणूक केलेल्यांचा निश्चित आकडा सर्वांच्या पावत्या जमा झाल्यानंतरच समजू शकेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
पैसे मिळतील का वो !- लसूण व्यापार करून जमतील तसे पैसे जमा करून आम्ही फायनान्समध्ये पैसे जमा केले. वर्षाला १३ ते १४ टक्के व्याज मिळायचे. गेल्या १० वर्षांपासून आम्ही पैसे भरत आलो. आतापर्यंत ९ लाख रुपये जमा झाले आहेत. गेल्या पाच-सहा दिवसांपासून आॅफिस बंद पडल्याचे कळल्यापासून आम्ही सर्व जण घाबरलो आहोत. हे पैसे मिळतील का वो, अशी व्यथा कांचन संती या वृद्धेने व्यक्त केली.
फसवणूक ५० कोटींच्या घरात- फिर्याद नोंदवणारे शिवानंद बागलकोटी यांनी स्वत:चे ११ लाख ७८ हजार रुपये आपण आॅनलाईन व चेकद्वारे भरले आहेत, असे स्पष्ट करताना आपल्या भावाचेही २० लाख रुपये असल्याचे स्पष्ट केले. अशा प्रकारे जवळपास २०० जणांंनी केलेल्या गुंतवणुकीचा आकडा ५० कोटींच्या घरात जाऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले. गुंतवलेल्या रकमेच्या काही पावत्यांवर ‘महालिंगेश्वर प्रसन्न’ अशीच नोंद दिसून येते. त्यावर रजिस्टर क्रमांक दिसून येत असल्याचेही अनेकांनी सांगितले.