सोलापूर : शेतातील भाजी विकण्यासाठी मार्केट यार्डात येणाऱ्या अज्ञात वाहनाने ठोकरल्याने गुळवंची येथील ३५ वर्षीय महादेव बाळासाहेब कदम या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. हा अपघात वडील बाळासाहेब यांच्या समोर झाला.
शेळगी पुलावर राष्ट्रीय महामार्गाच्या वतीने रस्ते दुरुस्तीसाठी खडबडीत करण्यात आले आहे. रस्ता दुरुस्तीचा इशारा देणारा फलक नसल्याने हा अपघात झाल्याचा आरोप उपस्थितांनी केला. महादेव कदम हे नेहमीप्रमाणे आपल्या वडिलांसोबत शेतातील माल विक्री करण्यासाठी सोलापूर मार्केट यार्ड येथे रविवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास आपल्या दुचाकीवरून येत होते. शेळगी पुलावर रस्ता खडबडीत करण्यात आला आहे. या ठिकाणी महादेव यांचे वडील बाळासाहेब हे दुचाकीवरून पडले.
काहींनी त्यांना पाहिले. त्यांनी लगेच आपली गाडी बाजूला लावत वडिलांना तेथून उचलले. पुन्हा मागच्या बाजूस लावलेली आपली गाडी घेण्यासाठी वळाले. त्याच वेळी अज्ञात वाहनाने त्यांना ठोकरले. ती घटना एवढी जलद घडली की कोणत्या वाहनाने महादेव यांना ठोकरले हे कळालेच नाही. महादेव यांचे वडील बाळासाहेब यांनी लगेच गावातील शेतकऱ्यांच्या मदतीने महादेव यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले. पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अज्ञात वाहन चालकाविरुद्ध जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
मदतीची मागणी
महादेव हे कष्टाळू होते. हे नेहमी दुसऱ्यांच्या मदतीला धावून येत होते. ते शेती बरोबर, कपाट दुरुस्तीचे कामही करत होते. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी आणि तीन मुली आहेत. कदम यांच्या कुटुंबीयांना स्व. गोपीनाथ मुंडे अपघात विमा अंतर्गत मदत मिळावी अशी मागणी गावातील नागरिकांनी केली.
सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा
महामार्गाची दुरुस्ती करताना त्या ठिकाणी सूचना फलक लावण्यात आलेला नव्हता. त्यामुळे दिवसभरात तेथे वीस पेक्षा जास्त शेतकरी व सामान्य नागरिक दुचाकीवरून पडले. यामुळेच गुळवंचीतील तरुणाला आपला जीव गमवावा लागला. या घटनेला जबाबदार असलेल्या संबंधित कर्मचारी आणि कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अन्यथा आंदोलन करू असा इशारा शिवसेना उपतालुका प्रमुख संजय पोळ यांनी दिला आहे.