सोलापूर : करमाळ्यातील बिटरगाव-वांगी परिसरात बिबट्याला ठार करण्यात आले. तीन बाजूला पाणी आणि एका बाजूला शूटर थांबवून बिबट्याची कोंडी करण्यात आली. त्यामुळे बिबट्याला दुसरीकडे जाणे शक्य नव्हते. या परिस्थितीत शूटरने बिबट्याला ठार केले, अशी माहिती उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांनी दिली.
बिबट्याला शुक्रवारी सायंकाळी ठार केल्यानंतर त्याचा मृतदेह रात्री उशिरा सोलापुरात आणण्यात आला. बिबट्याचे अंत्यसंस्कार हे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात आले. हे करत असताना त्याचे नमुने व माहिती जतन करण्यात आली. केंद्र सरकारच्या नॅशनल टायगर कॉन्झर्व्हेशन अॅथॉरिटीच्या (एनटीसीए) मार्गदर्शक तत्त्वानुसार बिबट्यावर अंत्यसंंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कार व शवविच्छेदनाचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्यात आले.
केळी आणि उसाच्या शेतात बिबट्याला पाहणेही कठिण झाले होते. करमाळाकरांचे सहकार्य आणि सांघिक कामगिरीच्या बळावर बिबट्याला ठार करण्यात आले. ठार करण्यासाठी शूटर्सच्या दोन टीम होत्या. धवलसिंह मोहिते-पाटील व मंडलिक यांच्या टीमने बिबट्याला ठार केले. बिबट्याचा मृत्यू झाल्याने परिसरातील नागरिकांना असणारी मागील एक महिन्यापासूनची भीती कमी होईल, अशी अपेक्षा पाटील य़ांनी व्यक्त केली. धैर्यशील पाटील यांची उपवनसंरक्षक म्हणून ही पहिलीच पोस्टिंग आहे. पदभार घेऊन दोन महिने झाले असताना बिबट्याची घटना घडली. शेख, बाटे, हाके, पवळे या वनविभागाच्या टीमने मिळून ही मोहीम पार पाडली.
--------
असा घेतला शोध
डॉग स्कॉड, ड्रोन कॅमेरा, डेटा अॅनालिसिस, डेटा मॅपिंग, पगमार्क यांचे मॅपिंग करून बिबट्या कुठे असू शकेल याचा अंदाज बांधण्यात आला. त्याच्या मागे न राहता बरोबर राहण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे तो कुठे असेल याचा योग्य अंदाज बांधणे शक्य झाले. ११ तारखेला बिबट्या दिसला होता. त्यानंतर सात दिवसांनी त्याला ठार करण्यात आले. शूटर्सनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार त्यांच्यावर बिबट्याने हल्ला केला असावा, त्याचा प्रतिकार करताना बिबट्यावर गोळ्या झाडण्यात आल्याचे धैर्यशील पाटील यांनी सांगितले.