विठ्ठलवाडीत गॅसचा स्फोट; युवकांच्या धाडसामुळे धोका टळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 09:33 PM2018-10-01T21:33:09+5:302018-10-01T21:34:53+5:30
सांगोला : वेळ आली होती परंतू काळ आला नव्हता, अशीच भयंकर घटना सोमवारी दु. १ च्या सुमारास महूद-विठ्ठलवाडी (ता. सांगोला) येथे घडली़ पितृपक्षानिमित्त घरात महिला म्हाळाचा स्वयंपाक बनवत असताना अचानक गॅसचा भडका होवून सिलेंडरने पेट घेतला. यावेळी महिला आरडाओरड करताच दोन युवक धाडसाने घरात प्रवेश करीत महिलांना दुसºया दवाज्यातून बाहेर काढले़ त्यानंतर पेटलेला सिलेंडर बाहेर काढून अग्निशमन बंबाच्या सहाय्याने नियंत्रण मिळविले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र गॅसची शेगडी, खिडक्याचे तावदाने, स्लॅब क्रॅक व फरशा फुटून मोठे नुकसान झाले आहे.
महूद (विठ्ठलवाडी) येथील सुभाष गोटे यांचे वडील शिवैक्य गिरीधर गोटे यांच्या पितृपक्षानिमित्त म्हाळाचा स्वयंपाक प्रिती गोटे, पूजा गोटे, ललिता गोटे या बनवीत होत्या. यावेळी सासू कमल गोटे बाजूला बसल्या होत्या. स्वयंपाक चालू असताना अचानक सिलेंडरमधून गॅस गळती होवून भडका उडाला आणि गॅसने पेट घेतला़ अचानक महिलांनी आरडाओरड सुरु केली.
यावेळी गर्दीतून सोमनाथ वाघमारे व तोसीम मुलाणी या दोघांनी धाडस करुन घरात प्रवेश करीत महिलांना घराबाहेर काढले. त्या दोघांनीच पेटलेला सिलेंडर किचनमधून बाहेर काढून त्यावर पाण्याचा मार केला व पोत्याचा बारदाना टाकून आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. परंतु आग आटोक्यात येत नव्हती. अखेर भारत गॅसचे वितरक सतीश धांडोरे यांच्याकडून अग्निशमन बंब आणून पेटलेल्या गॅस सिलेंडरवर नियंत्रण मिळविल्याने सर्वांच्या जीवात जीव आला. रात्री उशीरापर्यंत या घटनेविषयी पोलिसात कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नव्हती.