सोलापूर: गोवर, रुबेला प्रतिबंधक लसीकरणाच्या मोहीमेत ६ डिसेंबर अखेर जिल्हयात ३ लाख ४१ हजार ९४२ मुलांना डोस देण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार यांनी शुक्रवारी दिली.
२७ नोव्हेंबरपासून लसीकरणास प्रारंभ करण्यात आला आहे. जिल्हा आरोग्य विभागाअंतर्गत ८ लाख ४७ हजार ४६८ तर ग्रामीण रुग्णालयाअतंर्गत १ लाख ३ हजार ३७६ मुलांना डोस देण्याचे उदिष्ठ आहे. त्याप्रमाणे लसीकरण कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. आत्तापर्यंत मोहीमेला शाळा व पालकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून, दररोज सरासरी ८६ टक्के लसीकरण होत आहे. आत्तापर्यंत २२२८ शाळांमधून २४३६ लसीकरण सत्र घेण्यात आले. यामध्ये ३ लाख ९३ हजार ६४८ मुलांना लसीकरण करण्याचे उदिष्ठ दिले होते, त्यापैकी ३ लाख ४२ हजार म्हणजे ८६ टक्के उदिष्ठ पूर्ण झाले आहे.
गोवर, रुबेला लस दिल्यानंतर भीतीने काही मुलांना चक्कर येण्याचे किरकोळ प्रकार घडले. पण या रोगांच्या विषाणूची गंभीरता लक्षात घेता पालकांनी कोणताही गैरसमज किंवा अफवांवर विश्वास न ठेवता ही लस मुलांना द्यावी असे आवाहन डॉ. जमादार यांनी केले आहे. जगातील १७३ देशात या रोगांना बळी पडणाºयांची ३६ टक्के इतकी संख्या भारतात आहे. जगात भारत डेंजर झोनमध्ये असल्याने गोवर, रुबेला रोग प्रतिबंधासाठी शासनाने ९ महिने ते १५ वर्षाच्या मुलांना ही लस देण्याचा राष्ट्रीय कार्यक्रम घेतला आहे. आतापर्यंत २७ राज्यात ही मोहीम यशस्वी झालेली आहे. त्यामुळे शाळांमधील शिक्षकांनी या रोगांचे गांभीर्य पालकांना पटवून द्यावे. ही लस एकदम सुरक्षीत असून, आपल्या बालकाचा या रोगांपासून बचाव करणारी आहे.
नाहीतर हे घडू शकते...गोवर, रुबेला हा आजार विषाणूमुळे होतो. मुलांना याची बाधा झाल्यावर न्युमोनिया, डायरेरिचा प्रभाव होऊन मृत्यू्चा धोका वाढतो. गरोदर मातांना लागण झाल्यावर जन्मणारे मूल कर्णबधीर, अंध किंवा हृदयाला छिद्र असणारे वा मृत असू शकते. याशिवाय लागण झाल्यावर गर्भपाताचा मोठा धोका आहे. या रोगाची लागण झाल्यावर औषध नाही, त्यामुळे उपचार हाच प्रतिबंध आहे. ही लस सुरक्षित असून, बालकांना टोचून घ्यावी. चक्कर येणे, ताप आल्यास कोणीही घाबरू नये. यासाठी आरोग्य विभागाची सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे डॉ. जमादार यांनी सांगितले.