अक्कलकोटमध्ये भर रस्त्यावर भरला शेळ्यांचा बाजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:16 AM2021-07-20T04:16:58+5:302021-07-20T04:16:58+5:30
अक्कलकोट : शेळी खरेदी - विक्री बाजार सोमवारी अक्कलकोटमध्ये भर रस्त्यावर भरला. या मार्गावरून पोलीस, नगरपालिका, महसूल आदी विभागांचे ...
अक्कलकोट : शेळी खरेदी - विक्री बाजार सोमवारी अक्कलकोटमध्ये भर रस्त्यावर भरला. या मार्गावरून पोलीस, नगरपालिका, महसूल आदी विभागांचे अधिकारी, कर्मचारी ये-जा करत राहिले. मात्र, कोणीच त्यांना तेथून हटवण्याचे कष्ट घेतले नाही. रस्त्यावरील अतिक्रमणामुळे रहदारीचा प्रश्न उपस्थित झाला आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक महिन्यांपासून जनावरे खरेदी - विक्री बाजार बंद आहे. सोमवारी अचानकपणे बॅगेहळळी रस्त्यावर बसवेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोर भर रस्त्यावर शेळ्या, बोकड, खरेदी - विक्री बाजार भरवला. त्यातूनच कसेबसे मार्ग काढीत मार्केट कमिटीचे अधिकारी, कर्मचारी, महसूल, पोलीस, नगरपालिका कर्मचारी, अधिकारी ये - जा करीत राहिले. मात्र, कोणीच याचे गांभीर्य घेतले नाही. यामुळे रस्ता चक्काजाम झाला होता.
यामुळे सर्वसामान्य नागरिकांना येथून येणे - जाणे कठीण झाले. कोरोना नियमांचा फज्जा उडाला. मागील १५ दिवसांपासून अक्कलकोट शहर, तालुक्यात कोरोना बाधित रुग्ण घटले असले तरी नागरिकांचा बेशिस्तपणा कमी झालेला नाही. तिसरी लाट येण्यास वेळ लागणार नसल्याची भीती ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केली आहे.
---
फोटो : १९ अक्कलकोट
अक्कलकोट येथील मार्केट यार्डाजवळ सोमवारी शेळी विक्री - खरेदी बाजार भर रस्त्यावर भरलेला दिसत आहे.