माजी आमदार नरसय्या आडम यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज (गुरुवारी) मंत्रालयात ग्रामविकास विभागाचे अतिरिक्त सचिव राजेश कुमार मीना यांच्याशी चर्चा केली. कुंभारी ग्रामपंचायतीचे विभाजन करून विडी घरकुल परिसराचे गोदूताईनगर नावाची स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्याची अनेक वर्षांची मागणी होती. गेल्या दहा वर्षांपासून या मागणीसाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. राजेश कुमार मीना यांनी दिवाळीपूर्वी गोदूताईनगर ही ग्रामपंचायत अस्तित्वात येईल, तसा अध्यादेश लवकरच काढणार असल्याचे शिष्टमंडळाला सांगितले.
तत्कालीन जिल्हाधिकारी जगदीश पाटील यांनी सन २०१० मध्ये कुंभारी ग्रामपंचायतीच्या विभाजनाचा प्रस्ताव पाठवला होता. स्वतंत्र महसुली गाव स्थापन करण्याची घोषणा त्यांनीच केली होती. त्यानंतर दोन वेळा हा प्रस्ताव परत आला होता. ग्रामपंचायत निवडणुकीचा कालावधी दोन वर्षांपेक्षा कमी असल्यास विभाजन करता येत नाही, असे कारण नमूद करण्यात आले होते. सलग अकरा वर्षांचा काळ लोटला. सातत्याने पाठपुरावा सुरूच आहे. तरीही ग्रामविकास विभाग त्याकडे लक्ष देत नव्हते, अशी खंतही नरसय्या आडम यांनी व्यक्त केली.
---------
कुंभारीसाठी विशेष बाब
सोलापूर जिल्हा परिषदेने गोदूताईनगर स्थापनेसाठी आवश्यक ती पूर्तता केली होती. सीईओ दिलीप स्वामी यांनी ११ ऑगस्ट २०२१ रोजी कुंभारी ग्रामपंचायतीचे विभाजन करून स्वतंत्र महसुली गाव म्हणून गोदूताई नगरसाठी विशेष बाब म्हणून मंजुरी देण्याचा फेर प्रस्ताव दाखल केला आहे. स्वामी यांनी आज स्वतः ग्रामविकासचे अतिरिक्त सचिव राजेश कुमार मीना यांच्याशी फोनवरून चर्चा केली, अशी माहिती आडम यांनी दिली.
--/---
वाढती लोकसंख्या
कुंभारी ग्रामपंचायतीच्या हद्दीत विडी घरकुल परिसर झपाट्याने वाढ होत आहे. नवीन वसाहती वाढत आहेत, सहाजिकच लोकसंख्येची भर पडत आहे. २०११ सालच्या जनगणनेनुसार विडी घरकुलची लोकसंख्या १५ हजारांच्या घरात होती. नवीन जनगणना झाली नाही. मात्र, सध्या या परिसराची लोकसंख्या २५ हजारांच्या घरात आहे.
-----
सोलापूर मनपा अथवा कुंभारी ग्रामपंचायत या दोन्ही ठिकाणी विडी घरकुल परिसराचा समावेश नाही. त्यामुळे शिक्षण, आरोग्य पायाभूत सुविधा यांपासून इथल्या नागरिकांना वंचित राहावे लागते. लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतीला वित्त आयोगाचा विकास निधी मिळतो; मात्र ग्रामपंचायत सुविधा पुरवत नाही हे चुकीचे आहे.
-नरसय्या आडम, माजी आमदार