सोलापूर : कोरोना लसीकरणासाठी आरोग्य विभागातर्फे आणखी २७ हजार डोस प्राप्त झाले आहेत, अशी माहिती लसीकरण समन्वयक डॉ. अनिरुद्ध पिंपळे यांनी दिली. जिल्हयात शुक्रवारी दोन हजारपैकी १ हजार ४९० जणांनी लस घेतली आहे.
जिल्ह्यात १६ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणास प्रारंभ झाला. पहिल्यादिवशी ११ केंद्रे होती. त्यानंतर आता २० केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. ९ सत्रात १३ हजार ३०० कर्मचाऱ्यांना लस देण्याचे उद्दिष्ट असताना १० हजार २६५ जणांनी लस घेतली आहे. उद्दिष्टापैकी ७७.२ टक्के लसीकरण झाले आहे. यासाठी १ हजार ६८ बाटल्या वापरण्यात आल्या आहेत. २० डोसच्या २० बाटल्या, तर १० डोसच्या १ हजार ४८ बाटल्या वापरण्यात आल्या आहेत.
पहिल्या टप्प्यात लसीकरणासाठी आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांची पोर्टलवर नोंद करण्यात आली होती. जिल्ह्यातील ३० हजार १८४ कर्मचाऱ्यांच्या नोंदीनुसार दोन डोस देण्यााठी ६० हजार ३६८ डोसची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार लसीकरणाच्या पहिल्या कार्यक्रम नियोजनानुसार ३४ हजार व त्यानंतर दुसऱ्यादिवशी सिव्हिल हॉस्पिटलसाठी २ हजार असे ३६ हजार डोस उपलब्ध करण्यात आले होते. लसीचा साठा येईल तशी उपलब्धता केली जाईल, असे आरोग्य विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले होते.