सोलापूर : एड्स जनजागृती कार्यक्रम राबविण्यासह प्रत्येक महिलेची गरोदरपणात एचआयव्ही चाचणी अनिवार्य केली आहे. त्यातच ज्या आधीपासूनच एचआयव्ही संसर्गित आहेत, अशांचे अपत्य बाधित जन्माला येऊ नये, यासाठी उपचार करण्यात येतात. त्यामुळे २०१९-२० या वर्षात जिल्ह्यात ८६ महिलांपैकी फक्त एका महिलेने पॉझिटिव्ह बाळास जन्म दिला, तर एका बाळाला संसर्गापासून वाचवता आले नाही.
एचआयव्ही बाधित महिला गरोदर राहिल्यास त्यांचे बाळही बाधित होऊ नये, यासाठी एड्स नियंत्रण विभागाकडून विशेष औषधोपचार दिले जातात. ते वेळेत घेतल्यास बाळ निगेटिव्ह जन्माला येते. १८ महिन्यांपर्यंतच्या चाचणीत ते निगेटिव्ह आले तर ते सामान्य मानले जाते.
मागील काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर जागृती करण्यात येत आहे. पहिल्या गरोदरपणाच्या वेळी एचआयव्ही चाचणी बंधनकारक आहे. त्यामुळे नवे रुग्ण समोर येतात, तर जे बाधित आहेत अशा गरोदर महिलांना निरोगी बाळ जन्माला यावे यासाठी औषधोपचार दिले जातात.
तीन एआरटी सेंटर
पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप अंतर्गत जिल्ह्यात ५४ एफआयसीटीसी खासगी रुग्णालयांत देण्यात आल्या आहेत. एचआयव्ही पॉझिटिव्ह व्यक्तींना तालुकास्तरावर एआरटी औषधोपचार मिळावे म्हणून जिल्ह्यात तीन ठिकाणी एआरटी सेंटर व पाच लिंक एआरटी सुरू केले आहे.
गर्भवती महिलांनी काय काळजी घ्यावी?
एचआयव्ही बाधित महिला गर्भवती असल्यास त्यांनी वेळेवर औषधोपचार, योग्य आहार घेणे गरजेचे आहे. नियमित तपासणी व आरोग्य विभागाचा सल्ला घेणेही आवश्यक असून, त्यामुळे बाळ निगेटिव्ह जन्माला येते.
अर्ली इनफन्ट डायग्नोसिस हा कार्यक्रम २०१० पासून जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या अंतर्गत एचआयव्ही बाधित महिलांना होणाऱ्या बाळाची सहा आठवडे ते १८ महिन्यांपर्यंत ड्राईड ब्लड स्पॉट पद्धतीद्वारे तपासणी केली जाते. तसेच गरजेचे सर्व उपचार एआरटी केंद्रामार्फत केले जातात.
- भगवान भुसारी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, एड्स नियंत्रण कक्ष