राजकुमार सारोळे
सोलापूर :कोरोना लस येणार म्हणून आरोग्य विभागाने लस साठविण्याची तयारी सुरू केली आहे. राज्य आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार जिल्हा आरोग्य विभागाने सोलापूर शहर, तालुके आणि ग्रामीण भागात लस साठविण्यासाठी ९ हजार ८०३ लिटर फ्रीजची तयारी केली आहे.
जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी कोरोना लस साठविण्यासंदर्भात बैठक घेतली. बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, लसीकरण विभागप्रमुख तथा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव यांच्या उपसिथतीत लसीचा साठा कसा करायचा याचे नियोजन करण्यात आले. जिल्हास्तरावर एक मोठे शीतगृह लागणार असल्याने कृषी विभागावर मनुकासाठी उभारलेले एक शीतगृह तयार ठेवण्याची जबाबदारी दिली आहे. याचबरोबर जिल्हा आरोग्य, महापािलका व ग्रामीण रुग्णालयात तयारी केली आहे.
७ अंशाचे आहेत शीतगृहकोरोना लस साठविण्पासाठी उणे १० ते २० अंशाचे शीतगृह आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे. लस कोणत्या कंपनीची येणार यावर हे तापमान ठरेल. पण सध्या फळ साठवणुकीसाठी वापरात असलेले ७ अंशाच्या क्षमतेचे खाजगी शीतगृह तयार ठेवण्यात आले आहेत.त्याचबराबेर प्राथिमक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय व मनपा केंद्रात फ्रीज ठेवणार आहेत.
लस पोहोचविण्यासाठी ९६ गाड्याकोरोनाची लस दाखल झाल्यानंतर गावोगावी लसीकरणाचे कॅम्प करण्यासाठी डीप फ्रीजची सोय असलेल्या ९६ गाड्या लागणार आहेत. यात जिल्हा परिषद प्राथिमक आरोग्य केंद्राच्या ७७, ग्रामीण रुग्णालयाच्या १४ तर महापालिका आरोग्य विभागाच्या ५ गाड्यांचा समावेश आहे.
जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी दिलेल्या सूचनेनुसार मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना लस साठविण्याचे नियोजन केले आहे. सोलापूर शहर, १०२९ ग्रामपंचायती व तालुक्यातील नगरपंचायतीनुसार लसीकरण करण्याची तयारी आहे. यासाठी लागणारे मनुष्यबळ, वाहने, फ्रीजची तयारी सुरू आहे.- डॉ. शीतलकुमार जाधव, जिल्हा आरोग्यअधिकारी