पंढरपूर : आषाढी यात्रा कालावधीत परंपरेनुसार श्री विठ्ठलाचे दर्शन २४ तास सुरु राहणार असल्याची माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने प्रसिध्दी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
आषाढी यात्रा दरवर्षी आषाढी शुध्द एकादशी या दिवशी भरते. यंदाच्या वर्षी आषाढी यात्रा बुधवार १ जुलै रोजी भरणार आहे. त्याचा कालावधी आषाढ शुध्द ।। १ (दि. २२ जून) ते आषाढ शुध्द ।। १५ (दि. ०५ जूलै) असा राहणार आहे. आढाषी यात्रा कालावधीत विठ्ठलाचे २४ तास दर्शन सुरु असते. त्यानुसार आषाढ शुध्द ।।३ बुधवार (दि. २४ जून) रोजी सकाळी ७ वाजता विठ्ठलाचा पलंग काढून विठ्ठलास लोड व रुक्मिणी मातेस तक्क्या देण्यात येणार आहे. त्यामुळे २४ जून पासून विठ्ठलाची पहाटे ४ ते ५ वाजेपर्यंत नित्यपुजा, सकाळी १०.४५ ते ११.१४ या वेळेत महानैवेद्य व रात्री ८.३० ते ९ वाजेपर्यंत लिंबूपाणी (गंधाक्षदा) अने नित्योपचार असणार आहेत.
सध्या कोरोना विषाणूमुळे भाविकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिर १७ मार्च ते ३० जून २०२० या कालावधीत भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे. भाविकांना दर्शन बंद केले असले तरी, विठ्ठलाचे नित्योपचार परंपरेनुसार सुरु राहणार आहेत. त्यामुळे आषाढी यात्रा कालावधीत २४ तास दर्शन हे विठ्ठलाच्या नित्योपचराचाच भाग असल्याने परंपरेनुसार सुुरु असणार आहे. परंतु भाविकांना विठ्ठलाचे प्रत्यक्ष दर्शन घेता येणार नाही. परंतु भाविकांसाठी २४ तास आॅनलाईन दशर्न घेता येणार असल्याचे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी सांगितले.