Good News; कार्तिकी यात्रा भरवण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी दिली परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2021 10:50 AM2021-11-07T10:50:17+5:302021-11-07T10:50:25+5:30
दिवाळीनंतर विठुरायाच्या भाविकांची सुरू होणार खरी दिवाळी...
पंढरपूर : राज्यातील वारकरी संप्रदायाचा विठुरायाचा कार्तिकी यात्रा सोळा हा फार महत्वाचा आहे. मागील दोन वर्षापासून कोरोना संसर्ग रोगाच्या संकटामुळे आषाढी सह अन्य यात्रा मोठ्या प्रमाणात भरण्यास शासनाने परवानगी नाकारली होती. परंतु यंदा दिवाळीनंतर आलेल्या कार्तिकी यात्रेचा सोहळा भरवण्यास जिल्हाधिकार्यांनी परवानगी दिली आहे. त्यामुळे राज्यातील भाविक, भक्त, वारकऱ्यांची दिवाळीनंतरच खरी दिवाळी सुरु होणार असल्याचे पाहायला मिळणार आहे.
विठ्ठलाच्या दर्शनाबाबत गाभाऱ्यामध्ये असलेल्या भाविकांची संख्या ठरवून गर्दी होणार नाही, याची मंदिर समितीने खात्री करावी. याकरिता अतिरिक्त कर्मचारी नेमणेत यावेत. यात्रा कालावधीमध्ये मंदिरामध्ये कोव्हिड-१९ प्रतिबंधात्मक नियमावली, सुरक्षित शारिरीक आंतर, मास्क, सॅनिटॉझर इ. चा वापर
भाविकांकडून केला जात आहे. याची खात्री करणेची जबाबदारी मंदिर समिती पंढरपूर यांचेवर राहिल.
विठ्ठलाच्या नित्योपचाराचाच भाग म्हणून कार्तिकी यात्रेच्या ६ ते २४ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत विठ्ठलाचा पलंग काढण्यात येणार आहे. या कालावधीमध्ये विठ्ठलाचे दर्शन भाविकांसाठी २४ तास खुले राहिल. याबाबतची कोव्हिड-१९ नियमावलीचे पालन करणेची तसेच सर्व उपाययोजना करणेची जबाबदारी मंदिरे समिती पंढरपूर यांची राहिल.
उपमुख्यमंत्री अजित पवार व मानाचे वारकरी यांचे हस्ते सपत्नीक विठ्ठलाची शासकीय महापुजा कार्तिकी एकादशीला पहाटे २.२० ते ३ वाजेपर्यंत होणार आहे. कार्तिकी एकादशी दिवशीचा रथोत्सवाच्या वेळी गर्दी न करता कोव्हिड-१९ प्रतिबंधात्मक नियमावलीचे पालन करुन रथोत्सव पार पाडावा. श्री विठ्ठल रुक्मिणी मातेस नैवेद्य हा नित्यापोचाराचाच भाग असल्याने नैवद्याच्या वेळेस कोव्हिड-१९ प्रतिबंधात्मक नियमावलीचे पालन करावे.
याबाबत उपाययोजना करणेची जबाबदारी मंदिरे समिती पंढरपूर यांची राहिल. श्री विठ्ठलाच्या पादुकांची मिरवणूक काढण्यात यावी.
दिंड्यामध्ये येणाऱ्या भाविकांनी मागणी केल्यास त्यांना ६५ एकर परिसरात उतरणेस परवानगी देण्यात येणार आहे. येणाऱ्या दिंड्यांचे व्यवस्थापन, पिण्याचे पाणी, स्वच्छता, आरोग्य व्यवस्था याबाबतच्या उपाययोजना करण्यात यावी.
मठामध्ये वास्तव्यास येणाऱ्या भाविकांनी मठातील धार्मिक विधी व परंपरा पार पाडताना कोव्हिड-१९ प्रतिबंधात्मक नियमावलीचे पालन करणेची सर्व जबाबदारी संबधीत मठाचे प्रमुख यांची राहील.
चंद्रभागा वाळवंटामध्ये १४ ते १६ नोव्हेंबर २०२१ या तीन दिवसांमध्ये मंडप टाकून किर्तन, प्रवचनांचे कार्यक्रमांना परवानगी देणेत यावी. परंतु किर्तन,
प्रवचनांकरिता तयार करणेत येणारा मंडप सर्व बाजूंनी खुला ठेवण्यात यावा. मंडपाच्या क्षमतेपेक्षा जास्त भाविकांना मंडपामध्ये प्रवेश देणेत येऊ नये. मंडपामध्ये भाविकांना निवासाकरिता परवानगी नाही.
आरोग्य विभाग हा पोलिस कर्मचारी, महसूल कर्मचारी, नगर पालिका प्रशासन तसेच इतर विभागाचे सर्व संबधीत अधिकारी व कर्मचारी यांची थर्मलस्क्रीनिंग करेल. तसेच पल्स ऑक्सि मीटरच्या सहायाने शरीरातील ऑक्सिजनची तपासणी करेल. मंदिर समिती सदस्य, सल्लागार समिती सदस्य, शासकीय अधिकारी कर्मचारी, मानाचे वारकरी यांची कोरोनाची तपासणी करण्यात येईल. यासहअन्य नियोजनाबाबत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आदेश काढला आहे.