Good News; दुहेरीकरण, विद्युतीकरणामुळे सोलापूर-मुंबईचा प्रवास दीड तासांनी कमी होणार
By Appasaheb.patil | Published: January 7, 2021 02:57 PM2021-01-07T14:57:24+5:302021-01-07T14:57:31+5:30
डबल डिस्टेन्स सिग्नलच्या कामाला हिरवा कंदील- डिसेंबर २०२१ अखेर होणार काम पूर्ण
आप्पासाहेब पाटील
सोलापूर : दुहेरीकरण व विद्युतीकरणानंतर आता सिग्नल यंत्रणा बळकट करण्यासाठी दौंड ते वाडी या मार्गावर दुहेरी अंतर सिग्नल लावण्याच्या प्रक्रियेला हिरवा कंदील मिळाला आहे. याशिवाय रेल्वेमार्गाचीही दुरुस्ती केली जात आहे. या डबल डिस्टन्स सिग्नलच्या कामामुळे सोलापूर विभागातून धावणाऱ्या एक्स्प्रेस, पॅसेंजर, मालगाड्या, किसान रेल्वे गाड्यांचा ताशी वेग वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे सोलापूर-मुंबईचा प्रवास एक ते दीड तासाने कमी होणार असल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.
मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात दौंड ते गुलबर्गा या दरम्यान दुहेरीकरणाचे काम वेगाने पूर्ण झाले. आता विद्युतीकरणाचेही काम अंतिम टप्प्यात आले आहे. रेल्वे क्रॉसिंगमुळे उशिराने धावणाऱ्या रेल्वेगाड्या भविष्यात निर्धारित वेळेत धावतील. प्रवाशांचा वेळ व मानसिक त्रास त्यामुळे वाचेल. हा मोठा फायदा दुहेरीकरण, विद्युतीकरण व डबल डिस्टन्स सिग्नलमुळे होणार आहे. सध्या ११० किमी प्रतितासाने धावणाऱ्या गाड्या १५० ते १७० किमी प्रति तास वेगाने धावणार असल्याचेही सांगण्यात आले.
चेतावणी देणारे सिग्नल फोर्स लागणार नाहीत
तज्ज्ञांच्या मते, स्टेशन यार्डच्या बाहेरील अंतर सिग्नलच्या एक किमी आधी दुहेरी अंतर सिग्नल बसवले जातील. या सिग्नलमध्ये एक हिरवा आणि दोन पिवळे दिवे असतील. ग्रीन लाइट झाल्यावर ट्रेन निर्धारित वेगाने पुढे जाईल. तर एक पिवळा प्रकाश नियंत्रित केला जाईल आणि दुसरा पिवळा प्रकाश आणखी नियंत्रित केला जाणार आहे. दुहेरी अंतराच्या सिग्नल यंत्रणेचा परिणाम म्हणून, रेल्वेचालक स्टेशनवरून पहिले सिग्नल पाहतील. यामुळे त्यांना रेल्वेचा वेग कायम ठेवण्यास आणि ट्रेनच्या कामकाजाची सुरक्षा वाढविण्यास मदत होणार आहे. या व्यवस्थेनुसार चेतावणी देणारे सिग्नल फोर्स लागणार नाहीत.
----------
अपघात होण्याची शक्यता कमीच...
दुहेरी अंतर सिग्नल बसविल्यामुळे गाड्या कोणत्याही कारणाशिवाय थांबणार नाहीत. या डबल डिस्टन्स सिग्नलमुळे गाड्यांच्या वेगावर परिणाम होणार नाही. गाड्यांच्या लोकोमोटिव्हमध्ये स्थापित भाग सुरक्षित डिव्हाइस दुहेरी अंतर सिग्नलच्या १२०० ते ८०० मीटर अंतरावर लोको पायलटना सतर्क करेल. अशा परिस्थितीत स्टेशन यार्डात अपघात होण्याची शक्यता पूर्णपणे संपुष्टात येईल.
सोलापूर विभागात दुहेरीकरण, विद्युतीकरणानंतर डबल डिस्टन्स सिग्नलच्या कामांची टेंडर प्रक्रिया सुरू झाली असून, डिसेंबर २०२१ अखेर हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. या कामामुळे निश्चितच रेल्वे गाड्यांचा वेग वाढणार आहे.
- शैलेश गुप्ता,
विभागीय व्यवस्थापक, मध्य रेल्वे, सोलापूर.