Good News; सोेलापूर शहर पोलिस दलातील महिला पोलिसांची ड्युटी आता आठ तासांची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2022 04:41 PM2022-01-11T16:41:13+5:302022-01-11T16:41:19+5:30
पोलीस आयुक्तांचे आदेश : महिला कर्मचाऱ्यांकडून आदेशाचे स्वागत
सोलापूर : शहर पोलीस दलातील महिला कर्मचाऱ्यांना पोलीस आयुक्तांनी नववर्षाची भेट दिली असून, शहर पोलीस दलातील महिलांना आता फक्त आठ तासांची ड्युटी असणार आहे. याबाबतचे आदेश पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी काढले आहेत. या आदेशाचे कर्मचाऱ्यांकडून स्वागत करण्यात येत आहे.
महिला पोलीस अंमलदारांना आपले कर्तव्य पार पाडत परिवाराची जबाबदारी पार पाडावी लागते. कौटुंबिक व शासकीय अशा दोन्ही जबाबदारीचा महिला अंमलदारांना ताळमेळ घालावा लागतो. याकरिता महिला पोलीस अंमलदारांची ड्युटी बारा तासांवरून ८ तास करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी सोमवारी सायंकाळी काढले आहेत. आदेश १ जानेवारीपासून लागू होतील, असेही आदेशात म्हटले आहे.
या काळात नसणार आठ तास ड्युटी
कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाचे बंदोबस्त जसे की स्वातंत्र्य दिन, गणेशोत्सव, ईद, मोहरम, नवरात्र, ख्रिसमस, नाताळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, प्रजासत्ताक दिन अशा वेळी अतिरिक्त कर्तव्याची आवश्यकता भासेल, अशावेळी अधिक काळ ड्युटी करणे हे महिला अंमलदारांना बंधनकारक असणार आहे, असेही आदेशात म्हटले आहे.