सोलापूर : कोरोनामुक्त झाल्यानंतर अनेकांना इतर त्रासाला सामोरे जावे लागते. पुणे, मुंबई येथे अशा रुग्णांची संख्या जास्त आहे. मात्र सोलापूरकरांसाठी चांगली बाब म्हणजे सोलापुरात पोस्ट कोविड रुग्णांची संख्या खूपच कमी आहे.
कोरोनातून बरे झालेल्या व्यक्तींच्या रक्तात गुठळ्या होणे, काही महिने श्वास घेण्यास त्रास होणे, फुफ्फुस व किडनीचे आजार, हृदयरोग अशा विविध समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे राज्याच्या आरोग्य विभागाने राज्यातील शासकीय रुग्णालयात पोस्ट कोविड ओपीडी सुरू करण्याचे आदेश दिले होते. सोलापुरातही छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात ११ सप्टेंबर रोजी पोस्ट कोविड ओपीडी सुरू करण्यात आली. ही ओपीडी सोमवार, बुधवार, शुक्रवारी दुपारी तीन ते पाच दरम्यान सुरू असते.
एकूण रुग्णांपैकी दोन ते तीन टक्के कोरोनानंतर अशक्तपणा जाणवतो. तसेच उपचार करत असताना ज्या रुग्णांना व्हेंटिलेटर लावलेले असते त्यांच्या फुफ्फुसावर सूज येऊ शकते. एक चांगली बाब म्हणजे अशा प्रकारचे रुग्ण सोलापुरात खूपच कमी आहेत. शासनाच्या सूचनेनुसार पोस्ट कोविड ओपीडी सुरू करण्यात आली आहे. येथे औषधोपचारासोबतच योगासन, प्राणायाम, फुफ्फुसाचे व्यायाम याबाबत सांगण्यात येते. याचा व्यक्तीवर चांगला परिणाम होतो, असे डॉ. लतिफ शेख यांनी सांगितले.
कोविड कवच अॅप...कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींना आरोग्य समस्या येऊ शकतात. या परिस्थितीत त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कोविड कवच अॅप विकसित करण्यात आले आहे. या अॅपच्या माध्यमातून कोरोनामुक्त व्यक्ती आपल्या समस्या मांडून तज्ज्ञातर्फे सल्ला घेऊ शकतात. अॅपमधून शासकीय रुग्णालयातील तज्ज्ञ एसएमएसद्वारे मार्गदर्शन करतील. यासाठी प्रत्येक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एका तज्ज्ञाची नेमणूक करण्यात आली आहे.
पोस्ट कोविड ओपीडी सुरू करुन जवळपास एक महिना पूर्ण झाला आहे. या एका महिन्यात चार जण उपचारासाठी आले होते. त्यापैकी दोघांना क्षयरोगाचा त्रास होता. या दोन रुग्णांना औषधे देऊन काही व्यायाम करायला सांगितले. सोलापुरात कोरोनानंतर त्रास होणाºया रुग्णांची संख्या तशी नगण्य आहे.- डॉ. लतिफ शेख, पोस्ट कोविड ओपीडी, शासकीय रुग्णालय, सोलापूर.