सोलापुरातील औषधे, भाजीपाला पार्सल गाड्यांद्धारे मुंबई-पुण्याला रवाना
By appasaheb.patil | Published: May 23, 2020 01:06 PM2020-05-23T13:06:12+5:302020-05-23T13:10:09+5:30
मध्य रेल्वेची सेवा : पार्सल गाड्यांद्धारे ६ हजार २४९ टन जीवनावश्यक वस्तंूची निर्यात
सुजल पाटील
सोलापूर : कोरोनामुळे देशात निर्माण झालेल्या राष्ट्रीय आपत्तीच्या काळात सर्वसामान्य लोकांना जीवनावश्यक वस्तूंची कमतरता पडू नये, याची खबरदारी मध्य रेल्वेद्वारे घेतली जात आहे. त्याचाच भाग म्हणून मध्य रेल्वेने आतापर्यंत भाजीपाला, औषधे, खाद्यपदार्थ व अन्य ६ हजार २४९ टन जीवनावश्यक वस्तू पार्सल गाड्यांव्दारे पाठविल्या आहेत. दरम्यान, सोलापुरातील औषधे, भाजीपाला, खाद्यपदार्थ, मास्क, सॅनिटायझर मुंबई, पुणे, नागपूरसह राज्यातील महत्त्वाच्या शहरात पार्सल गाड्यांद्वारे पोहोच झाल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली.
दरम्यान, संपूर्ण देशात कोरोना या आजाराने थैमान घातले आहे.या विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी देशभरात संचारबंदी (लॉकडाऊन) पुकारण्यात आला आहे. या लॉकडाऊनमुळे भारतीय रेल्वे मंत्रालयाने प्रवासी वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला. या बंद काळात अत्यावश्यक सेवेचा पुरवठा खंडित होऊ न देता तो सुरळीत ठेवण्यासाठी मध्य रेल्वेनेसोलापूर, नागपूर, पुणे, कल्याण, मुंबई, भुसावळ आणि नाशिक विभागातून पार्सल गाड्या चालविल्या. या गाड्यांद्वारे आतापर्यंत ६ हजार २४९ टन वस्तू पाठविण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने दिली.
या जीवनावश्यक वस्तूंची केली निर्यात...
- मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, सोलापूर, पुणे, मुंबई, कल्याण, नागपूर, भुसावळ आणि नाशिक येथून देशभरातील विविध ठिकाणी ६ हजार २४९ टन जीवनावश्यक वस्तू पाठवल्या. लॉकडाऊन कालावधी दरम्यान या पार्सल गाड्यांद्वारे मध्य रेल्वेने २ हजार ३७३ टन खाद्यपदार्थ / नाशवंत, २ हजार ९२८ टन हार्ड पार्सल, ८६१ टन औषध / फार्मा उत्पादने, ५८ टन पोस्टल बॅगा आणि २९ टन ई-कॉमर्स उत्पादनांची वाहतूक केली आहे. त्याचप्रमाणे मध्य रेल्वेने औषधे, टपालाची पिशवी, भाजीपाला, खाद्यपदार्थ, दुधाचे पदार्थ आणि हार्ड पार्सल्सही गाड्यांद्वारे पाठविण्यात आले. मध्य रेल्वेवरील नागपूर, पुणे, नाशिक, अकोला, नागपूर, कलबुर्गी, मनमाड, भुसावळ, सीएसएमटी आदी विविध स्थानकांपर्यंत आवक केली आहे.
टपाल अन् रेल्वे विभागाचा झाला करार...
- या पार्सल गाड्या चालवण्याव्यतिरिक्त, मध्य रेल्वेने महाराष्ट्र टपाल आणि रेल्वे सेवा घराघरात आॅफर देऊन महाराष्ट्र राज्यातील भारतीय टपाल सेवा आणि भारतीय रेल्वेच्या क्षमता एकत्रित करण्यासाठी महाराष्ट्र पोस्टल सर्कलशी हातमिळवणी केली आहे. सुरुवातीस ही सेवा मुंबई, पुणे, नागपूर स्थानकांमधून आणि दरम्यान उपलब्ध होईल आणि नंतर इतर स्थानकांवर विस्तारित केली जाणार आहे.लवकरच सोलापुरातही ही सेवा सुरु होणार असल्याची माहिती वरिष्ठ वाणिज्य मंडल प्रबंधक प्रदीप हिरडे यांनी ‘लोकमत’ला दिली.
प्रवासी सेवा बंद असतानाही भारतीय रेल्वे प्रशासनाने लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवेला प्राधान्य दिले आहे. अन्नधान्याचा पुरवठा करण्यासाठी मालगाड्या चालविण्यात येत आहेत. एवढेच नव्हे तर शासनाच्या मदतीने राज्यात अडकून पडलेल्या परप्रांतीयांना श्रमिक ट्रेनच्या माध्यमातून त्यांच्या राज्यात पोहोच करण्यात येत आहे. प्रवासी बंद काळात प्रवाशांनी रेल्वे प्रशासनास सहकार्य करावे.
- प्रदीप हिरडे,
वरिष्ठ वाणिज्य मंडल प्रबंधक,