Good News; आई कोरोनाग्रस्त अन् तिचे बाळ आहे कोरोनामुक्त !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2020 11:32 AM2020-05-16T11:32:28+5:302020-05-16T11:36:23+5:30
सोलापूर; शासकीय रूग्णालयात नऊ कोरोनाग्रस्त माता प्रसूत, दोघींना मिळाला डिस्चार्ज...
शीतलकुमार कांबळे
सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) स्त्री रोग व प्रसूतीशास्त्र विभागाने कोरोना विषाणूच्या प्रसारात वाढ होत असताना किमया केली आहे. मागील दोन महिन्यांमध्ये कोरोना संसर्गित नऊ मातांची प्रसूती डॉक्टरांच्या पथकाने केली. दोन महिलांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. प्रसूतीनंतर आतापर्यंत एकाही बाळाला कोरोनाची लागण झालेली नाही, हे या डॉक्टरांचे यश आहे.
कोरोना संसर्गित महिलेची प्रसूती करणे तसे अवघड काम आहे. स्वत:ला कोरोनाच्या विषाणूपासून वाचवत बाळाला सुरक्षित राखण्याची महत्त्वाची जबाबदारी या डॉक्टरांवर आहे. हे करत असताना तांत्रिक मदतीसोबतच मानसिकता सकारात्मक राखत काम करण्याची गरज असते. ही भूमिका डॉक्टर व त्यांची टीम व्यवस्थित पार पाडताना दिसत आहे. आतापर्यंत कोरोना वॉर्डामध्ये ८६ जणांना (कोरोनाबाधित व संशयित) प्रसूतीसाठी प्रवेश देण्यात आला होता. यापैकी ७५ मातांनी मुलांना जन्म दिला असून, ११ महिलांची प्रसूती व्हायची आहे.
कोरोना संसर्गित मातांवर उपचार करत असताना पीपीई किट (पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट) चा वापर योग्य पद्धतीने करावा लागतो. रुग्ण हाताळण्यासाठीच्या सर्व नियमांचे अतिशय काटेकोरपणे पालन करतच स्त्रीरोग व प्रसूती विभागाची टीम हे काम करत आहे. पीपीई किट, मास्क, फेस शिल्ड अशा पद्धतीने डॉक्टरांनी स्वत:च्या संरक्षणार्थ वेश परिधान करत नव्या जीवांना या जगात आणले. प्रसूती करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आॅपरेशन थिएटर निर्जंतुक करण्यात येते. तसेच प्रसूतीच्या वेळी वापरण्यात आलेले बेडदेखील सोडियम हायपोक्लोराईडने निर्जंतुकीकरण करण्यात येते. यामुळे नंतर येणाºया रुग्णांना विषाणूचा संसर्ग होत नाही.
आई-बाळामध्ये सहा फुटांचे अंतर
- प्रसूती तारखेच्या पाच दिवस आधी महिलांचा स्वॅब घेण्यात येतो. याच्या अहवालानंतर पुढील उपचाराची दिशा ठरते. प्रसूतीनंतर आईला बाळापासून वेगळे न करता सहा फुटांचे अंतर राखण्यात येत आहे. काळजी करण्यासाठी एक जण असतो. बाळाला दुधाची गरज असताना मास्क व ग्लोव्हजचा वापर करत आई बालकांना स्तनपानही करत आहेत. गरज पडल्यास दूध काढून, नंतर बाळाला पाजले जाते. आयसीएमआर (इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च) यांनी सांगितलेल्या नियमाप्रमाणे तसेच अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर व डॉ. एस. ए. जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभाग काम करत असल्याचे विभाग प्रमुख डॉ. विद्या तिरनकर यांनी सांगितले.
सध्या आयसोलेशन वॉर्डामध्ये जन्मलेल्या सर्व बालकांची प्रकृती उत्तम असून, दोघांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहे. गर्भवती मातांनी सकस आहार घ्यावा, बाहेर जाणे टाळावे, स्वच्छता ठेवावी, फिजिकल डिस्टन्सच्या नियमांचे पालन करावे, मास्क वापरावा. या पद्धतीने राहिल्यास कोरोनाला दूर ठेवता येऊन सुदृढ बाळ जन्म घेऊ शकेल.
- डॉ. विद्या तिरनकर, विभाग प्रमुख, स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र,
छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, सोलापूर