दिलायादायक बातमी; रेल्वे प्रवासात तुम्हाला मदत हवीय ? तर मग १३९ वर करा ना कॉल

By Appasaheb.patil | Published: August 19, 2022 04:00 PM2022-08-19T16:00:00+5:302022-08-19T16:00:54+5:30

रेल्वेचं प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य; प्रत्येक कॉल्सला मिळतं समाधानकारक उत्तर

good news; Need help with your train journey? Then call 139 | दिलायादायक बातमी; रेल्वे प्रवासात तुम्हाला मदत हवीय ? तर मग १३९ वर करा ना कॉल

दिलायादायक बातमी; रेल्वे प्रवासात तुम्हाला मदत हवीय ? तर मग १३९ वर करा ना कॉल

Next

आप्पासाहेब पाटील

सोलापूर : भारतीय रेल्वेने प्रवाशांचा प्रवास अजून सुखकर हाेण्यासाठी माेठे पाऊल उचलले आहे. रेल्वेमध्ये याआधी मदतीसाठी वेगळा क्रमांक, तक्रारींसाठी भिन्न क्रमांक आणि चाैकशीसाठी वेगळाच नंबर, अशी अवस्था हाेती. प्रवाशांना रेल्वे प्रवासादरम्यान येणाऱ्या विविध समस्या आणि आवश्यक चाैकशांसाठी वेगवेगळ्या हेल्पलाइन क्रमांकांवर संपर्क साधण्याच्या गैरसाेयीपासून रेल्वे प्रवाशांची सुटका करण्याच्या उद्देशाने, प्रवासादरम्यान प्रवाशांना काही समस्या उद्भवल्या किंवा काही चाैकशी करावयाची असेल, तर त्यासाठी भारतीय रेल्वे विभागाच्या १३९ या एकाच एकीकृत हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधायचा आहे.

सध्या परिचलनात असलेल्या रेल्वेच्या सर्व हेल्पलाइन क्रमांकांऐवजी आता १३९ हा एकच क्रमांक अस्तित्वात आला आहे. गेल्या वर्षी रेल्वे विभागाच्या तक्रार निवारण हेल्पलाइन्स खंडित करण्यात आल्या. आता, १८२ हा सध्या परिचालनात असलेला हेल्पलाइन क्रमांक देखील खंडित करण्यात आल्या आणि त्यावरील सेवा १३९ क्रमांकाद्वारे दिल्या जाणाऱ्या सेवांमध्ये विसर्जित हाेतील.

---------

१२ भाषांमध्ये करता येईल तक्रार

१२ भाषांमध्ये हेल्पलाइन क्रमांक १३९ च्या सेवा उपलब्ध असतील. प्रवाशांना आयव्हीआरएस प्रणालीद्वारे ही सेवा वापरता येईल किंवा फाेनवरील (अस्टेरीस्क) हे चिन्ह दाबून काॅल सेंटरमधील साहाय्यकाशी प्रत्यक्ष बाेलता येईल. आपल्या तक्रारीवरून सहाय्यक संबंधित यंत्रणेला कळवतील अन् काही वेळानं प्रवाशांची मदत होईल.

----------

स्मार्टफोनच असावा असं काही नाही

१३९ या क्रमांकावर संपर्क साधण्यासाठी स्मार्टफाेन उपलब्ध असण्याची गरज नाही. त्यामुळे सर्व प्रकारचे फाेन वापरणारे प्रवासी या सुविधेचा लाभ घेऊ शकतील. फक्त कोणताही कॉल केल्यावर समोरच्या सहाय्यकाला स्पष्ट ऐकू आलं पाहिजे. त्यांनी सांगितलेले रेल्वे गाडीचा नंबर, तक्रार व अडचणीविषयी समोरच्याला समजलं पाहिजे.

-------

दररोज येतात कॉल...

सध्या १३९ या हेल्पलाइन क्रमांकावर चाैकशीसाठी सरासरी प्रतिदिन ३ लाख ४४ हजार ५१३ काॅल अथवा संदेश येत आहेत, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. यात सोलापूर विभागात दररोज १० ते १५ कॉल्स येतात. यातील काही कॉल्स फेकही येत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान, दिवसभरात येणारे सर्व कॉल्सला रेल्वेकडून मदत केली जाते.

---------

कोणत्या कारणास्तव करता येतो कॉल

  • - चोरीचा प्रयत्न झाला.
  • - अनोळखी बॅग डब्यात दिसली.
  • - नातेवाइकांना फोन लागत नाही.
  • - अस्वच्छता, डब्यात गर्दी
  • - स्मोकिंग अन् दारू पिलेल्या व्यक्तीविरोधात

--------

रेल्वेत प्रवास करताना प्रवासी १३९ या टोल फ्री नंबरवर कॉल करतात. त्यांना तातडीने मदत केली जाते. मदतीनंतर संबंधित प्रवाशांकडून आम्ही फिडबॅकही घेतो. रेल्वेचा प्रवास आता सुरक्षित प्रवास बनला आहे. प्रवाशांना कोणत्याही अडचणी आम्ही येऊ देत नाही. प्रवाशांच्या सुरक्षेला आम्ही प्राधान्य देतो.

- श्रेयांश चिंचवाडे, सुरक्षा आयुक्त, रेल्वे सुरक्षा बल, सोलापूर मंडल

 

Web Title: good news; Need help with your train journey? Then call 139

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.