सोलापूर : जिल्हयातील सेतू व महा ई सेवा केंद्र सुरू करण्यास जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी परवानी दिली आहे. तसेच लवकरच मंगल कार्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे.
कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यानंतर १३ मार्च रोजी साथरोग कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली. साथीचा संसर्ग वाढू नये म्हणून सेतू कार्यालय व महा ई सेवा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. सध्या ३0 जूनपर्यंत लॉकडाऊन जाहीर केलेला असला तरी साथीच्या प्रतिबंधासाठी आवश्यक असलेल्या नियमांचे पालन करून विविध व्यवसाय व आस्थापना सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
जुलै महिन्यात शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. नवीन शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर पालकांना विविध दाखले व इतर गोष्टींसाठी सेतू कार्यालय व महा ई सेवा केंद्र सुरू करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी होत होती. याचा विचार करून १४ अटी व शर्तीचे पालन करून सेतू कार्यालय व ई सेवा केंद्र उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने फिजीकल डिस्टन्स, गर्दी होऊ न देणे, प्रत्येक व्यक्तीचे थर्मल स्ॅकनिंग, नोंदवही, सॅनीटायझर, हात धुण्याची सुविधा उपलब्ध असणे गरजेचे आहे. आजारी व्यक्तींनी प्रवेश करू नये असे फलक लावणे, शिबीर घेऊ नयेत ही बंधने असणार आहेत. प्रतिबंधीत क्षेत्रातील केंद्रांना परवानगी नाकारण्यात आली आहे.
याच पार्श्वभूमीवर मंगल कार्यालय सुरू करण्यास परवानगी देता येईल काय याची चाचपणी सुरू आहे. निवासी उप जिल्हाधिकारी अजित देशमुख यांनी मंगल कार्यालये सुरू झालेल्या सांगली व इतर जिल्ह्यातील नियमावली मागविली आहे. मंगल कार्यालयानाही लवकरच अटी व शर्तीवर परवाने देण्याचा प्रस्ताव आहे.