Good News; सोलापूर शहरातील प्रदूषणात सरासरी पेक्षा ७० टक्क्यांनी घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 10:45 AM2020-04-10T10:45:24+5:302020-04-10T10:51:38+5:30
लॉकडाऊन इफेक्ट; एयर क्वालिटी इंडेक्सही सुधारला
शितलकुमार कांबळे
सोलापूर : लॉकडाऊनमुळे शहराचा वेग मंदावला असला तरी शहरांमधली हवेची गुणवत्तेत सुधारणा झाली आहे. एरव्ही मध्यम असणारा एअर क्वॉलिटी इंडेक्स समाधानकारक आणि उत्तम असल्याची सध्या नोंद होत आहे. शहरातील प्रदूषणात सरासरी ७० टक्के घट झाल्याची माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रमुख प्रशांत भोसले यांनी 'लोकमत' शी बोलताना दिली.
प्रदूषण विभागामार्फत केलेल्या या सर्वेक्षणात नायट्रोजन आॅक्साइड व धुलीकणांचे प्रमाण हे कमी झाल्याचे आढळून आले आहे. महापालिका, सात रस्ता, वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय परिसरातील हवा गुणवत्ता नेहमीपेक्षा शुद्ध असल्याचे त्या ठिकाणी असलेल्या प्रदूषण मापन केंद्रावरील माहीतीवरुन स्पष्ट होत आहे. कोरोनाच्या पाशर््वभूमीवर संचारबंदी लागू असल्याने शहरातील वाहतूक व्यवस्था जवळपास थांबली आहे. तसेच फेरीवाले लोंकांची वर्दळ यातही घट झाल्याने हा फरक पडला आहे.
कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी अगोदर जमावबंदी व आता १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊनचा अंमल करण्यात आला आहे. यामुळे सर्व प्रकारची सार्वजनिक आणि खासगी वाहतूक बंद करण्यात आली आहे. केवळ अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही ठप्प आहे. परिणामी, रस्त्यांवर प्रचंड शुकशुकाट असून एखाद-दोन वाहनेच दृष्टीस पडत आहेत. यामुळे शहरातील वायूप्रदूषणाची पातळी झपाट्याने कमी झाली आहे. कोरोनामुळे सर्व नागरिक घरातच असल्याने कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी मदत होत असताना दुसरीकडे काही दिवसांकरिता तरी प्रदूषण कमी झाल्याचे चित्र आहे.
लॉकडाऊनमुळे अनेक व्यवसाय बंद आहेत. त्यामुळे लोक घरीच आहेत. अनेक जण वर्क फ्रॉम होम करत आहेत. त्यामुळे रस्त्यांवर वाहतूक कमी आहे. अनेक कंपन्या बंद असल्याने कच्च्या मालाच्या होणाºया पुरवठ्यासाठीची वाहतूकही बंद आहे. वाहतूक बंद असल्याने गाड्यांचा धूर, धुळही कमी झाला आहे.
-------
सोलापूर हिरव्या रंगाच्या गटात
प्रदूषण विभागामार्फत हवेतील दर्जा तपासण्याबाबत चार गट केलेले आहेत. यात हिरवा, पिवळा, नारंगी आणि लाल या रंगाचा समावेश आहे. त्यात हिरवा रंग अति शुद्ध हवा म्हणून नोंद होते. तर पिवळ्या रंगात मध्यम शुद्ध, नारंगी रंगात प्रदूषित, तर लाल रंग असलेला परिसर अति प्रदूषित गटात मोडतो. मागील वर्षी एप्रिल महिन्यात सोलापूर शहर पिवळ््या रंगात मोडत होते. सध्या सोलापूर शहर परिसर हा हिरव्या रंगाच्या गटात मोडत आहे. त्यामुळे शहरातील प्रदुषणात घट झाल्याचे दिसून येत आहे.
--------
लॉकडाऊनमुळे शहारील हवा शुद्ध झाली आहे. कार्बन डायआॅक्साईड, सल्फर डाय आॅक्साईड या घातक वायूंचे प्रमाण कमी झाल्याने वातावरण स्वच्छ झाले असून हवेतील आॅक्सिजनचे प्रमाण वाढले आहे. वाहनेच रस्त्यांवरून धावत नसल्याने ध्वनिप्रदूषणालाही आळा बसला आहे. त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. सरासरी शहराचे प्रदूषण ७० टक्क्यांनी कमी झाले आहे.
- प्रशांत भोसले, उपप्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ