Good News; ‘यूपीएससी’च्या तारखांमुळे शिक्षक पात्रता परीक्षा लांबणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 06:09 PM2021-09-22T18:09:55+5:302021-09-22T18:10:23+5:30
विद्यार्थ्यांकडून स्वागत : ३१ ऑक्टोबरला होणार परीक्षा
सोलापूर : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्यावतीने घेण्यात येणारी सिव्हिल सर्व्हिस प्रीलियम आणि शिक्षक पात्रता परीक्षा १० ऑक्टोबरला म्हणजे एकाच दिवशी आल्याने विद्यार्थ्यांच्या वेळ पाहता टीईटीच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आले आहे. सीईटीची परीक्षा ही आता १० ऑक्टोबरऐवजी ३१ ऑक्टोबरला घेण्यात येणार आहे. याबाबतचे पत्र नुकतेच काढण्यात आले आहे.
शिक्षक भरती होत नसल्यामुळे अनेक विद्यार्थी हे स्पर्धा परीक्षांकडे वळाले आहेत. मागील अनेक वर्षांपासून ते स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत. त्यातच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या वेळापत्रकात कोरोनामुळे वेळोवेळी बदल करण्यात आले आणि त्यानंतर या परीक्षा आता १० ऑक्टोबरला घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. सोबतच मागील वर्षी न झालेली महाराष्ट्र राज्य परिषदेच्यावतीने आयोजित होणारी शिक्षक पात्रता परीक्षा अर्थातच टीईटी ही परीक्षा हे १० ऑक्टोबरला होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी असल्यामुळे विद्यार्थ्यांना एका परीक्षेला मुकावे लागणार होते. यामुळे वेळापत्रकामध्ये बदल करण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून होत होती.
या बाबी लक्षात घेता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने नुकतेच एक पत्र काढत टीईटी परीक्षा हे ३१ ऑक्टोबरला सकाळी साडेदहा ते दुपारी एकपर्यंत व दुसरी परीक्षा दोन ते साडेचार या वेळेत घेणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
अभियोग्यता टेस्टही लवकर घ्या!
दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आल्यामुळे महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थांना कोणत्या तरी एक परीक्षेला मुकावे लागणार होते. त्यामुळे संघटनेच्यावतीने प्रशासनाकडे पाठपुरावा केला. त्यामुळे विद्यार्थ्याचा संभ्रम समजून घेऊन प्रशासन येणारी संभाव्य अडचण दूर केली. त्यामुळे लाखो विद्यार्थांना दोन्ही पेपरला बसता येणार आहे. पुढील काळात केंद्राच्या धर्तीवर राज्यात पण सर्व पेपर सुरळीत पार पाडावेत. टीईटीप्रमाणे शिक्षक अभियोग्यता पेपर पण लवकरात लवकर घेण्याचा प्रयत्न करावे, असे मत डी. एड्. बी.एड्. स्टुडंटस् असोसिएशनचे सरचिटणीस प्रशांत शिरगूर यांनी केले आहे.
विद्यार्थ्यांना नोकरीची गरज असताना सरकारने शिक्षक भरती बंद केली. त्यामुळे आता अनेक विद्यार्थ्यांचे वय निघून जात आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी हे स्पर्धा परीक्षांकडे वळाले आहेत. त्यातच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा आणि टीईटी परीक्षा एकाच दिवशी आल्यामुळे विद्यार्थ्यांची धांदल उडणार होती पण राज्य शासनाने योग्य निर्णय घेतल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही.
- दीपाली माने, परीक्षार्थी
येत्या १० ऑक्टोबरला केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. त्याच दिवशी महाराष्ट्र परीक्षा मंडळ देखील टीईटी परीक्षा आयोजित केले होते पण याने अनेक विद्यार्थ्यांची गैरसोय होत होती. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा आणि गैरसोय विचार करून मंडळाने टीईटीची परीक्षा पुढे ढकलली गेली आहे. त्यामुळे त्यांचे स्वागत आणि आभार.
- नंदकुमार बनसोडे, परीक्षार्थी