सोलापूर - सोलापूर-म्हैसूर-सोलापूर या एक्सप्रेसचे ‘आयसीएफ’ कोच हद्दपार करून त्याऐवजी सर्व ठिकाणी ‘एलबीएच’ कोच बसविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार २४ जून २०२२ पासून एलबीएच कोचसह धावणार आहे. त्यामुळे सोलापूरकरांचा प्रवास आता सुखकर व आरामदायी होणार आहे.
दरम्यान, आतापर्यंत भारतीय रेल्वेच्या ताफ्यात मेन लाइनवर चेन्नई येथील इंटीग्रल कोच फॅक्टरीत (आयसीएफ) तयार केलेले कोच वापरले जात आहेत. ‘आयसीएफ’ स्वीस कार व एलिव्हेटर मॅन्युफॅक्चरिंग कंपनीच्या मदतीने १९५० पासून या कोचची निर्मिती करीत आहेत. मात्र, यापुढील काळात ‘आयसीएफ’ कोच हद्दपार करून त्याऐवजी सर्व ठिकाणी ‘एलबीएच’ कोच वापरले जाणार असल्याची घोषणा भारतीय रेल्वेने केली आहे. त्यानुसार मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील गाड्यांना आता हळूहळू एलबीएच कोच बसविण्यात येत आहेत. म्हैसूर-सोलापूर-म्हैसूर एक्सप्रेसच्या कोचेसमध्ये कायमस्वरूपी एलएचबी कोचेसमध्ये बदल करण्याचे निर्णय दक्षिण पश्चिम रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
------------
२१ डब्यांचे आयसीएफ कोच हद्दपार...
म्हैसूर-सोलापूर-म्हैसूर ही एक्सप्रेस २४ जून आणि २५ जून २०२२ रोजी म्हैसूरमधून तर २५ जून व २६ जूनला सोलापुरातून धावणार आहे. या गाडीला २ ब्रेकयान, एक व्दितीय वातानुकूलित, ३ तृतीय श्रेणी वातानुकूलित, १२ शयनयान, २ सामान्य व्दितीय श्रेणी असे एकूण २१ डबे असणार आहेत. गाडीतून प्रवास करताना प्रवाशांनी काेरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.