वीज कनेक्शन तोडलेल्या शासकीय कार्यालयांना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:16 AM2021-07-08T04:16:10+5:302021-07-08T04:16:10+5:30
आता रकमेसाठी कुलूप ठोकण्याची दिली तंबी दक्षिण सोलापूर : वीज बिल भरले नाही या कारणाने कनेक्शन तोडल्यानंतर आज दुसऱ्या ...
आता रकमेसाठी कुलूप ठोकण्याची दिली तंबी
दक्षिण सोलापूर : वीज बिल भरले नाही या कारणाने कनेक्शन तोडल्यानंतर आज दुसऱ्या दिवशीही शासकीय कार्यालयात कामकाज ठप्प राहिले. मंगल कार्यालयाने आता थकीत भाड्यासाठी कार्यालयांना कुलूप ठोकण्याची तंबी दिली आहे.
सहस्रार्जुन मंगल कार्यालयाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर शासकीय कार्यालयांना जागा भाड्याने देण्यात आली आहे. या शासकीय कार्यालयांनी वीज बिलाची रक्कम भरली नाही. त्यामुळे महावितरणने मंगल कार्यालयाचे मंगळवारी सकाळी वीज कनेक्शन खंडित केले होते . बहुतेक कार्यालयात संगणकीय प्रणालीचा वापर केला जातो. त्यामुळे भाडेतत्त्वावर असलेल्या सर्व शासकीय कार्यालयांचे कामकाज दोन दिवसांपासून ठप्प राहिले आहे. बुधवारी दुसऱ्या दिवशीही महावितरणने वीज जोडली नाही. त्यामुळे चारही कार्यालयातील दुसरा दिवस कामाविना वाया गेला.
या मंगल कार्यालयात वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक ( माध्य.) कार्यालय , शाळा न्यायाधीकरणाचे पीठासीन अधिकारी कार्यालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आणि निरंतर प्रौढ शिक्षणाधिकारी कार्यालय सध्या सुरू आहेत. सहायक कामगार आयुक्त कार्यालयाने जागा सोडली असून ती रिक्त आहे. सलग दोन दिवस चारही कार्यालयातील कामकाज ठप्प राहिले.
-------
लाखो रुपयांची थकबाकी
शासकीय कार्यालयांनी मुख्य मीटरमधून स्वतंत्र वीज कनेक्शन घेतले आहे. या महिन्यात एकत्रित ३० हजार रुपये वीज बिल भरण्यात आले नाही. त्यामुळे महावितरणने मंगळवारी वीजपुरवठा बंद केला. शासकीय कार्यालयांनी मंगल कार्यालयाचे जागा भाडे थकवले आहे त्यामुळे मंगल कार्यालयाची आर्थिक स्थिती कमकुवत झाल्याने वीज बिल भरता आले नाही अशी कबुली मंगल कार्यालयाचे व्यवस्थापक मोहन गुर्रम यांनी दिली.
------
न्यायाधीकरण आणि ग्रंथालय अंधारात
शाळा न्यायाधीकरण आणि जिल्हा ग्रंथालय याच इमारतीत चालते. वीजपुरवठा बंद केल्याने शाळा न्यायाधीकरण
कामकाज करता आले नाही तर जिल्हा ग्रंथालय संघात दिवसाही अंधार पसरला होता त्यामुळे नियमित वाचक आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय झाली.
-------
कुलूप लावण्याचा इशारा
शासकीय कार्यालयांनी वीज बिलाची आणि जागेच्या थकीत रकमेचा भरणा केला नाही तर या कार्यालयांना कुलूप लावण्याशिवाय पर्याय नाही असा इशारा बुधवारी सहस्रार्जुन मंगल कार्यालयाच्या विश्वस्तांनी दिला आहे, अशी माहिती वेतन पथकाचे अधीक्षक प्रकाश मिश्रा यांनी दिली.
--------