सोलापूर : पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपने सोमवारी सांगली जिल्ह्यातील संग्राम देशमुख यांची उमेदवारी जाहीर केली. राष्ट्रवादीकडून सोलापूरचे उमेश पाटील, श्रीमंत कोकाटे आणि सांगली जिल्ह्यातील अरुण लाड यांच्यात रस्सीखेच असून तिघांपैकी एकाची बंडखोरी अटळ आहे. यात सोलापूर जिल्ह्यातील मतदारांच्या भूमिकेला महत्त्व असणार आहे.
पुणे पदवीधर मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहे. पक्षसंघटनेत काम करणाऱ्या कार्यकर्त्याला या मतदारसंघातून उमेदवारी देण्याचा भाजपचा पायंडा होता. परंतु, तो यंदा मोडण्यात आला आहे. भाजपकडून रोहन देशमुख इच्छुक होते. लोकमंगल परिवाराने मतदार नोंदणी मोहीमही राबविली होती. भाजपने सांगलीच्या देशमुखांची उमेदवारी जाहीर केली. या उमेदवारीचे देशमुख गटाकडूनही स्वागत झाल्याचे सोमवारी पाहायला मिळाले.
राष्ट्रवादीकडून अरुण लाड, उमेश पाटील आणि श्रीमंत कोकाटे इच्छुक आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लाड यांची उमेदवारी निश्चित केल्याचा दावा लाड समर्थक करीत आहेत. उमेश पाटलांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार अडून आहेत. कोकाटे यांनी प्रचाराला सुरुवात केलेली आहे. राज्यात सत्ता असताना पुणे पदवीधर मतदारसंघ भाजपच्या ताब्यात राहिला. महाविकास आघाडीच्या माध्यमातून हा मतदारसंघ ताब्यात घेण्याचा चंग राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बांधला आहे. परंतु, बंडखोरी झाल्यास राष्ट्रवादीचे मतविभाजन अटळ आहे.
उमेश पाटील दादांकडे, लाड समर्थक सोलापुरात
उमेश पाटील उमेदवारीसाठी अजित पवार यांच्याकडे ठाण मांडून बसले असताना अरुण लाड यांचे सांगलीतील लोक सोलापुरातील राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत प्रचाराची यंत्रणा लावण्यात गुंतल्याचे सोमवारी पाहायला मिळाले. त्यामुळेही राष्ट्रवादीच्या एका गटात अस्वस्थता होती.