पंढरपूर : मूळचे बुलढाण्याच्या असलेल्या नव्वदीत असलेल्या अंजनीबाई हांडके या आजीनं पंढरपुरात पानटपरी चालवून चिकाटीच्या जोरावर आपल्या नातवाला सीए बनविले आहे. सीए परीक्षेचा मंगळवारी निकाल जाहीर झाला अन् त्यामध्ये पंढरपूर तालुक्यातून या आजीचा नातू ऋषिकेश हांडके हा एकमेव उत्तीर्ण विद्यार्थी म्हणून पुढे आला आहे. या यशाचं पंढरपूर तालुक्यात कौतुक होत आहे.
अंजनीबाई हांडके या मूळच्या दादुलगाव (ता. खामगाव, जि. बुलढाणा) येथील रहिवासी. ३० वर्षांपूर्वी पतीचं घरच्यांसोबत भांडण झाले. त्यामुळे पती रूसून पंढरपूरला निघून आले. त्यांच्या पाठोपाठ अंजनीबाईंनीही पंढरपूर गाठलं. पंढरपुरातच गवंड्याच्या हाताखाली काम, मठात भाकरी थापणे, याशिवाय मिळ्यल ती कामे करत त्यांनी आपला उदरनिर्वाह सुरू ठेवला. त्यानंतर पतीनं २० वर्षांपूर्वी पंढरपूर-स्टेशन रोड परिसरात पानटपरी सुरू केली. मात्र, अवघ्या काही दिवसांनंतर पतीचं निधन झालं तेव्हापासून पानटपरीचा ताबा स्वत:च्या हाती घेत या आजीने तिन्ही नातवांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वत:च्या खांद्यावर घेतली.
सीए परीक्षेत पंढरपूर तालुक्यात एकमेव उत्तीर्ण झालेला ऋषिकेश लहानपणापासूनच हुशार. मात्र, परिस्थिती नसल्याने त्याला आम्ही फारसे काही देऊ शकलो नाह, असं अंजनीबाईनं स्पष्ट केलं. दहावीपर्यंतचे शिक्षण हलाखीत गेले. ११वी, १२वी चे शिक्षण कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर येथे झाले. त्यावेळी तो १२ वी वाणिज्य शाखेतून महाविद्यालयात प्रथम आला. त्याचवेळी त्याने पुण्याला शिक्षणाला जायची कल्पना आजी व वडिलांकडे बोलून दाखविली. त्यावेळी आजी व वडिलांनी परिस्थिती नसतानाही त्याला पुण्याला जाण्यासाठी परवानगी दिली. त्याच्यासोबत त्याची दुसरी बहीण पूजा व भाऊ अतुल ही दोन्ही भावंडे स्पर्धा परीक्षा व सीए परीक्षेच्या तयारीसाठी पुण्याला गेली. त्यानंतर आजीने पानटपरी चालवून स्वत:चा प्रपंच चालवून त्या तिन्ही भावंडांसाठी पुण्याला प्रत्येक महिना २० हजार रुपयांचा खर्च चालू ठेवल्याचे ऋषिकेशने सांगितले.
विक्रीकर आयुक्त होण्याचं स्वप्न
तब्बल पाच वर्षे आजी व वडिलांनी घेतलेलं कष्ट समोर ठेवून अभ्यास केला आणि सीएच्या परीक्षेत उत्तीर्ण झालाे. आता यापुढे दोन्ही भावंडांच्या शिक्षणासाठी आजी व वडिलांना त्रास होणार नाही, याची काळजी घेण्याचा प्रयत्न करणार असल्याचे ऋषिकेशने सांगितलं भविष्यात आपल्याला शासकीय लेखापरीक्षक किंवा स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून विक्रीकर आयुक्त होण्याचे स्वप्न असल्याचे त्याने बोलून दाखविलं.
आजी म्हणते.. नातवाला लाल दिव्याच्या गाडीत बघायचंय
हाताला मिळेल ते काम करत २० वर्षांपासून पानटपरी चालवत नातवाला साहेब करायचंच, या जिद्दीने पेटलेल्या आजीचा प्रवास नातू सीए झाल्यावरही थांबलेला नाही. तर यापुढेही तो मोठा अधिकारी बनून लाल दिव्याच्या गाडीत फिरलेला बघण्याचं स्वप्न आजीनं उराशी बाळगलं असल्याचं आजी अंजनीबाई हांडके यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
फोटो:
नातू सीए झाल्यानंतर प्रसन्न भावमुद्रेत आजी अंजनीबाई हांडके व नातू ऋषिकेश.