उन्हाळ्याच्या कडाक्यात बागा, झाडांना सांडपाण्याचा आधार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 02:34 PM2019-04-25T14:34:17+5:302019-04-25T14:38:49+5:30
पाणी बचतीचे धोरण; देगावच्या मलनिस्सारण केंद्रातील पाण्याचा टँकरने पुरवठा
सोलापूर : उन्हाच्या कडाक्यात नागरिकांना चार ते पाच दिवसाआड पाणी मिळते तिथे उद्याने, सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता यासाठी पाणी कुठून द्यायचे, असा प्रश्न महापालिकेसमोर होता. हा प्रश्न मनपा आयुक्त दीपक तावरे यांनी निकाली काढला आहे. महापालिकेच्या देगाव मलनिस्सारण प्रक्रिया केंद्रातील पुनर्प्रक्रिया झालेले पाणी गेल्या दोन दिवसांपासून टॅँकरद्वारे शहरातील उद्याने, रस्ता दुभाजकातील झाडे यांना दिले जात आहे.
गेल्या तीन महिन्यांपासून शहरात पाणीटंचाई आहे. निवडणुकीच्या काळात शहरात पाच ते सहा दिवसाआड पाणीपुरवठा झाला. पाणीटंचाईमुळे उद्याने, दुभाजकातील झाडांना पाणी देण्यात अडचणी येत होत्या. महापालिकेचे देगाव येथे ७५ एमएलडी क्षमतेचे मलनिस्सारण केंद्र आहे. प्रक्रियेनंतर शुध्द झालेले पाणी नाल्यात सोडले जाते. देगाव परिसरातील शेतकरी या पाण्यावर शेती पिकवितात. महापालिका आयुक्त दीपक तावरे यांनी नुकतेच या मलनिस्सारण केंद्राची पाहणी केली. शुध्द झालेल्या पाण्याचा पुनर्वापर व्हायला हवा. हे पाणी थेट नाल्यात सोडण्याऐवजी टॅँकरद्वारे उद्याने, दुभाजकातील झाडे, रस्त्याची कामे, सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता अशा कामांसाठी देण्यात यावे, अशी सूचना केली. त्यानुसार सार्वजनिक आरोग्य अभियंता कार्यालयातील अधिकाºयांनी देगाव मलनिस्सारण केंद्रावर टॅँकर भरण्यासाठी पंप बसवून घेतले. गेल्या दोन दिवसांपासून टॅँकरद्वारे शहरातील बागा, हरित क्षेत्र, दुभाजकांना पाणी दिले जात आहे.
इस्रायलसारख्या देशात कमी पाऊस असताना मोठ्या प्रमाणावर शेती होते. आपल्याकडे पाण्याचा पुनर्वापर करण्याची सवय लागायला हवी. मलनिस्सारण केंद्रातील प्रक्रिया झालेल्या पाण्याचा पुनर्वापर झाल्यामुळे पिण्याच्या पाण्याची बचत होईल. पुनर्प्रक्रिया झालेल्या पाण्याला कोणत्याही प्रकारचा वास अथवा त्यात कोणत्याही प्रकारचे हानिकारक घटक नाहीत. बांधकामासाठी हे पाणी वापरता येऊ शकते. महापालिका त्यादृष्टीने धोरणही आखणार आहे.
- दीपक तावरे
आयुक्त, मनपा