भीमानगर : गावपातळीवर महत्त्वाचे सत्ताकेंद्र असलेल्या ग्रामपंचायतींची माढा तालुक्यातील कोंढारभागात रणधुमाळी सुरू आहे. सत्तेचे सिंहासन आपल्या ताब्यात घेण्यासाठी स्थानिक नेत्यांची मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. तालुक्यातील ८२ ग्रामपंचायतींचे धुमशान रंगत आहे.
नववर्षात ग्रामपंचायतीत सत्तेच्या सिंहासनावर कोण विराजमान होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातच १४ व्या वित्त आयोगाचा निधी थेट ग्रामपंचायतीच्या नावे येत असल्याने आता जिल्हा परिषद सदस्य अथवा पंचायत समिती सदस्य यांना जेवढे महत्त्व नाही तेवढे ग्रामपंचायत सरपंचाला महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यातच कोंढारभाग हा बागायती भाग असल्याने ऊस, केळी हमखास उत्पन्न देणारी पिके येथे घेतली जातात. आर्थिक उन्नतीबरोबर राजकीय उन्नतीसाठी प्रयत्न होतात.
आलेगाव बुद्रुक, आलेगाव खुर्द, रूई, रांझणी-भीमानगर, गारअकोले, टाकळी टें, शेवरे, नगोर्ली, शिराळ (टें), शिराळ या व इतर अशा तालुक्यातील ८२ ग्रामपंचायतींचा निवडणूक धुराळा उडाल्याने कार्यकर्ते रिचार्ज झाले आहेत. बहुप्रतीक्षेतील निवडणूक जाहीर झाल्याने सर्व गट, तट मोर्चेबांधणीला लागले आहेत. दाखले काढणे, कागदपत्रांची जुळवाजुळव करणे यात राजकीय मंडळी व्यस्त आहेत. सर्वात जास्त निधी ग्रामपंचायतींकडेच असल्याने सरपंच पदासाठी इच्छुकांची संख्या वाढली आहे. मात्र यंदा सरपंचपद कोणाकडे जाणार हे निवडणुकीनंतर कळणार आहे. त्यामुळे खर्च कुणी आणि कोणासाठी करायचा हा मुद्दा उपस्थित झाला आहे.