पिसाळलेल्या कुत्र्यांचा हैदोस; नऊ जनावरांचा मृत्यू, पाच जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2020 08:07 AM2020-04-29T08:07:03+5:302020-04-29T08:09:58+5:30
पिंपळखुटे येथील घटना; सारा गाव दहशतीखाली; लस ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध करण्याची मागणी
कुर्डूवाडी: एकीकडे कोरोना व्हायरसच्या धसक्याने सर्वांची झोप उडाली आहे. सर्व सरकारी यंत्रणा त्याविरुद्ध लढत आहे.अशातच पिंपळखुटे येथे पिसाळलेल्या कुत्र्यांनी हैदोस माजवला आहे. या हल्ल्यात पाच नागरिक जखमी झाले आणि नऊ जनावरांना प्रसाद मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यातच पिसाळलेल्या श्वानावरील लस इथल्या सरकारी दवाखान्यात उपलब्ध नाही म्हणून आरोग्य यंत्रणेने सोलापूरला जायचा सल्ला दिला. लोकांनी मात्र सोलापुरात कोरोना रुग्णांच्या धास्तीनं घरी राहणं पसंत केलं आहे.
पिंपळखुटे येथील एका शेतकºयाची गाय अज्ञात कारणाने मृत्यू पावली. त्यामुळे त्याने तिला ओढत नेऊन उघड्यावरच शेतात टाकली. लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या उपाशीपोटी भटक्या कुत्र्यांनी त्यावर ताव मारला अन् सर्व कुत्री क्षणांत पिसाळलेल्या अवस्थेत गावात माणसांबरोबर जनावरांनाही चावा घेत फिरू लागली. हे ज्यावेळेस गावकºयांना समजले तोपर्यंत पाच ग्रामस्थांना,नऊ जनावरांना त्यांनी चावा घेतला होता. यामुळे गावात एकच खळबळ उडाली अन् पिसाळलेल्या सर्व कुत्र्यांना गावकºयांनी मारण्याचे ठरवले. आतापर्यंत १९ पिसाळलेली कुत्री गावकºयांनी मारली व जाळूनही टाकली आहेत. तोपर्यंत ज्या ज्या जनावरांना ती कुत्री चावली होती त्यातील गाई, म्हशीसह तब्बल नऊ जनावरे मृत्युमुखी पडली.
कुत्र्याने चावा घेतला म्हणून गावातील संबंधित पाच जणांनी पिंपळनेर आरोग्य केंद्र व कुर्डूवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी धाव घेतली पण तिथेही त्यावरील औषध व इंजेक्शन उपलब्ध नसल्याने त्यांना एका नेत्याच्या फोनवरून केम (ता. करमाळा) येथील सरकारी दवाखान्यात पाठवले; मात्र तिथे डॉक्टरांनी माढा तालुक्यातील रुग्ण आहे म्हणून इंजेक्शने दिली नाहीत. उलट सोलापूरला जाण्याचा सल्ला दिला. प्राथमिक उपचार करून परत पाठवण्यात आले. कोरोनाच्या धसक्याने ते पाचजण प्राथमिक उपचारानंतर अद्याप सोलापूरला पुढील उपचारासाठी जाण्यास तयार नसल्याचे पुढे आले आहे.
संबंधित शेतकºयाने त्याची गाय मृत्यू पावल्यानंतर पुरुन न टाकता उघड्यावर टाकल्याने हा प्रकार घडल्याचे गावकºयांचे म्हणणे आहे. दोन दिवसांनी वास आल्याने गावातील भटकी कुत्री त्याकडे वळली व ती कुत्री पिसाळलेल्या अवस्थेत गावात फिरू लागली. दिसेल त्याला चावा घेऊ लागली. त्यांनी जनावरांनाही सोडले नाही. त्यात चावा घेतलेली अनेक जनावरे मृत्युमुखी पडली आहेत.या घटनेबद्दल आ. संजयमामा शिंदे व झेडपीचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी आरोग्य विभागास सूचना देऊनही डॉक्टरांनी दुर्लक्ष केल्याचे गाºहाणे ग्रामपंचायत सदस्य पवन पाटील यांनी लोकमतला सांगितले.
नागरिक पडले दुहेरी संकटात
- गावातील संध्या किशोर भोसले (वय ६),अनिल किसन सुरवसे (वय ४२), आबा येताळ बोडरे (वय ३८), सुरेखा दौंड (वय ५०), अथर्व किशोर मोरे (वय ७) या नागरिकांना व बालकांना कुत्र्यांनी चावा घेतला आहे. याशिवाय रमेश बोराटे यांची जर्सी कालवड, बळीराम बोराटे यांची जर्सी गाय, हनुमंत बोराटे यांची रेडी, आबा बोराटे यांची देशी गाय, संभाजी भोसले यांची म्हैस, उत्तम बोराटे यांच्या दोन शेळ्या व आण्णा बोडरे यांची एक शेळी या सर्व जनावरांना पिसाळलेल्या कुत्र्यांनी चावा घेतल्याने त्यात ते मृत्युमुखी पडले आहेत. त्यामुळे गावातील बहुसंख्य शेतकरी एकीकडे कोरोना व्हायरसमुळे तर दुसरीकडे अशा आपत्कालीन संकटामुळे पुरता भरडला असल्याचे दिसून येत आहे.
कुर्डूवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात कुत्र्यांनी चावा घेतला असेल तर त्यावर इंजेक्शन आहे. पण पिसाळलेल्या कुत्र्यांनी चावा घेतल्यास त्यावर जे इंजेक्शन पाहिजे ते येथे नाही. आपण सिव्हिल हॉस्पिटलकडे पाठवितो. त्याप्रमाणे त्यांंना येथील उपचार करून पुढे जाण्यास सांगण्यात आले होते.
- डॉ. संतोष आडगळे
अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय,