सख्खा भाऊ पक्की मैत्री; अडीच एकरांत घेतले चार लाखांचे उत्पन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2020 04:08 PM2020-03-04T16:08:15+5:302020-03-04T16:11:46+5:30
लिंबू उत्पादनातून दोघा भावांनी साधली किमया; मुंबईच्या बाजारात मिळाला सर्वाधिक भाव
संभाजी मोटे
वाळूज : वडिलांच्या २५ एकरात पारंपरिक पिकेच़़़ दोन बांधवांना वाटले प्रयोग करावा... अत्यल्प पाणी, मनुष्यबळ आणि कमी खर्चातल्या लिंबाची लागवड केली... मिश्रखते, निंबोणी खताच्या माध्यमातून तीन वर्षांनंतर पहिल्याच फळपिकाने चार लाखांचे उत्पन्न मिळवून दिले आहे़ स्थानिक बाजार पेठेपेक्षा मुंबईतील वाशीच्या बाजारपेठेत एका डागाला ४०० रुपयांचा दर मिळाला. ही किमया साधली आहे मोहोळ तालुक्यातील देगाव (वा.) येथील आतकरे कुटुंबातील दोन बांधवांनी.
विकास आणि प्रकाश आतकरे असे त्या दोन बांधवांची नावे़ त्यांच्या वडिलांची पारंपरिक २५ एकर शेती आहे. परंतु ते जुन्या पद्धतीने ज्वारी, गहू, हरभरा, ऊस ही पिके घेत होते. शेतीमध्ये वडिलांना मदत करत-करत विकास आणि प्रकाश यांनी शेती करण्यास सुरुवात केली. दोघांचे दहावीपर्यंतचे शिक्षण झाले. तिसरे बंधू गणेश हे पूर्णवेळ सहशिक्षक म्हणून माध्यमिक विद्यालयात काम करताहेत.
या दोन बंधूंनी पाच वर्षांपूर्वी कागदी लिंबाची अडीच एकरात लागवड केली़ २० बाय २० अंतरावर २५० झाडांची लागवड केली. लागवड केल्यापासून तिसºया वर्षी प्रथम फळ तोडणीला सुरुवात झाली. एप्रिल आणि मे माहिन्यात संपूर्ण बागेत वाढलेले तण काढून घेतले़ उन्हाळ्यामध्येच भरपूर शेणखत टाकले.
लिंबाचा हंगाम हा बारा महिने आहे. त्यामुळे दररोज पैसे मिळवून देणारे उत्पन्न म्हणून याकडे पाहिले जाते़ लिंबावर डाग पडणे म्हणजेच (कँकर) हा मुख्य रोग आहे. तसेच मूळकुज (खोडकिडा) म्हणजे झाड वठणे हे प्रामुख्याने रोग येतात. या रोगावर मात करीत संपूर्ण २५० झाडं जगवली. नुआन कराटे, बाविस्टिन ही औषधे फवारून बाग जोपासली. मिश्र खते, निंबोणी खत, २६:२६ ही रासायनिक खते आणि शेणखत टाकून बाग वाढवली. वर्षभरात खुरपणी, रासायनिक खते, औषधे आणि शेणखत यांचा मिळून खर्च २५ हजार झाला. तसेच पहिल्याच वर्षी एकूण २० किलोप्रमाणे एक हजार डाग उत्पादन निघाले़ एका डागाला त्यांना ४०० रुपये दर मिळाला. एकूण वार्षिक उत्पन्न ४ लाख रुपये मिळाले. निघालेला सर्व माल मुंबईच्या वाशी बाजारपेठेत विक्री पाठविला.
चमेली बोराचे आंतरपीक
वडिलांच्या २५ एकर शेतीतून काय पिके घ्यायची, यावर आम्ही दोघा भावांनी नियोजन केले़ या बागेच्या जोरावरच चमेली वाणाच्या बोराचीही लागवड केली. तसेच शेती करत-करत गावात दूध व्यवसाय चालू केला. लिंबाच्या माध्यमातून दररोज पैसे मिळतात़ त्यामुळे पैशाची अडचण केव्हाच जाणवली नाही़ लिंबामुळे आतकरे कु टुंबाच्या वैभवात भर पडली.
कोणतेही पीक हे प्रयोगशील पद्धतीने घ्यावे. त्यामुळे नियोजन होते आणि भरपूर पीक घेता येते़ आज देगावमधल्या लिंबाला स्थानिक बाजारपेठ असतानाही वाशीच्या बाजारपेठेने चांगला दर मिळाला़ इतर नगदी पिकांपेक्षाही अधिक उत्पादन घेता आले ते केवळ नियोजनामुळे आणि प्रयोगशीलतेमुळे.
- विकास आतकरे, लिंबू उत्पादक