मंगळवेढा : मंगळवेढा शहरात संभाजीनगर भागातील एका शेतकऱ्याच्या बंगल्याचे लोखंडी खिडक्याचे गज तोडून कपाटात ठेवलेले १ लाख ५२ हजार रुपये किमतीचे सोने-चांदी आणि रोख रक्कम पळविल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, अलीकडे घरफोडीचे प्रकार वाढले असून, चोरट्यांना जेरबंद करण्यात पोलिसांना अपयश येत असल्याची ओरड नागरिकांतून होत आहे.
याबाबत श्रीपात विठ्ठल गोवे (रा. संभाजीनगर, मंगळवेढा) यांनी मंगळवेढा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
शुक्रवारी रात्री जेवण आटोपून गोवे यांचे आई-वडील पोर्चमध्ये झोपी गेले होते. सकाळी सहा वाजता आई उठून अंगण झाडून दुसरी खोली झाडण्यासाठी खोलीकडे निघाल्या असताना आतून कडी लावलेली आढळून आली. त्यामुळे आईला खोलीचा दरवाजा उघडता आला नाही. त्या खोलीच्या पाठीमागे जाऊन खिडकीतून पाहिले असता लोखंडी खिडकी तुटलेली दिसली. बाजूला कपाटाचा ड्रॉवर, स्टिलचे डब्याचे झाकण अन्यत्र पडलेले दिसले. चोरट्यांनी खिडकीचे लोखंडी गज तोडून घरात प्रवेश करून कपाटाच्या बाजूला हँगरवर ठेवलेली चावी काढून घेतली. त्यानंतर लॉकरमधील दागिने पळविले.
---
जन्या घरफोड्याचा छडा नाही
यापूर्वी मंगळवेढा शहर व ग्रामीण भागात चोऱ्या झाल्या आहेत. मागील आठवड्यात हुलजंती येथे चोरट्यांनी बंगला फोडून लाखाच्या वर ऐवज पळविला. आतापर्यंत झालेल्या एकाही चोरीच्या तपासाचा छडा लावण्यात पोलीस यंत्रणेला यश आलेले नाही. चोरट्यांचे धाडस वाढत चालले असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे. घरफोड्यांबरोबरच मोटारसायकली चोरीचे प्रमाणही वाढले आहे. पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांनी मंगळवेढ्यातील वाढत्या चोऱ्यांबाबत लक्ष घालण्याची मागणी होत आहे.