लक्ष्मण कांबळे
कुर्डूवाडी : मुंबईहून तरकारी गाडीने गावात आला... गावचा विरोध झाला... घाबरून सासरवाडी गाठली, तिथेही थारा मिळाला नाही... गावात दुसºया नातेवाईकांच्या घरी मुक्काम केला... तिथंही कुणकुण लागली... तेथून सरकारी दवाखान्यात रवानगी झाली आणि डॉक्टरांनी होम क्वारंटाइन केले़...त्याच्या या फिरस्तीनंतर पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला... याची वार्ता संपूर्ण तालुक्यात पसरली आहे.
हा प्रकार घडला आहे चव्हाणवाडीच्या (ता. माढा) येथील एका ३५ वर्षीय तरुणाची़ हा तरुण मुंबईत दहिसर भागात काम करतो़ लॉकडाउन काळात तो एका तरकारी वाहतूक करणाºया खासगी वाहनातून स्वत:च्या गावात बेकायदेशीरपणे प्रवेश केला़ पण ग्रामस्थांनी त्याला बेकायदेशीरपणे आला म्हणून गावात राहण्यास नकार दिला़ त्याची चांगलीच पंचाईत झाली़ यावर उपाय काढत त्याने सासरवाडी गाठली़ पण तिथेही थारा मिळला नाही़ जावईबापू मुंबईवरून आल्याचे समजताच ‘एवढ्या वेळेस माफ करा, पण गाव सोडा’... अशी विनवणी करून ग्रामस्थांनी गावाबाहेर काढले. कंटाळून त्याने लऊळ गावात दुसºया नातेवाईकांकडे आपला मोर्चा वळविला.
येथील नातेवाईकांचे घर हे वस्तीवर असल्याने पहिल्या एक-दोन दिवसातच याची कुणकुण ग्रामस्थांना लागली़ पण येथील काही जागरूक नागरिकांनी लागलीच सरपंच दिनेश कांबळे यांना कळविले. त्यानंतर मात्र प्रशासनाची सूत्रे वेगाने फिरली अन् त्या तरुणाला तपासणीसाठी कुर्डूवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. हा सारा प्रकार पाहून वैद्यकीय अधिकाºयांनी त्याला १४ दिवसांसाठी होम क्वारंटाइन केले आणि घर न सोडण्याच्या सूचना दिल्या.
त्यानंतर ती व्यक्ती पुन्हा चव्हाणवाडी या मूळ गावी गेली़ पण आपल्याला काही झाले आहे की काय? या भीतीने तो एका खासगी दवाखान्यात तपासणीसाठी गेला़ होम क्वारंटाइन केलेली व्यक्ती आपल्याकडे आली म्हणून संबंधित डॉक्टरने पुन्हा सरकारी दवाखान्यातच पाठविले. तो होम क्वारंटाइन होऊनही माढा तालुक्यातील अनेक गावातून फिरतोय म्हणून कुर्डूवाडी पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला. नगरपालिकेने तयार केलेल्या निवारा केंद्रात त्यास धाडले.
याबाबत कुर्डूवाडीच्या ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ़ संतोष आडगळे यांच्याशी संवाद साधला असता संबंधित व्यक्तीवर प्राथमिक औषधोपचार करून होम क्वारंटाइन असल्याने मोडनिंब येथील प्राथमिक आरोग्य केंद्राकडे पाठविण्यात आल्याचे सांगितले़ पुन्हा तो तालुक्यातील अनेक गावात फिरत असल्याचे निदर्शनास येताच पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या साºया घटनाक्रमानंतर तो होम क्वारंटाइन होऊनही कोरोना आजाराची कोणतीही लक्षणं त्याच्यात दिसून आली नसल्याचेही डॉ. आडगळे यांनी यावेळी सांगितले.
अनेक गावात फिरल्याने नोंदला गुन्हा- संबंधित व्यक्ती हा मुंबईतून बेकायदेशीरपणे आला होता. त्याला त्याच्या लऊळमधील नातेवाईकांकडून आरोग्य यंत्रणेने तपासणीसाठी ताब्यात घेतले होते. कुर्डूवाडी ग्रामीण रुग्णालयात त्याची तपासणी झाली़ त्याला १४ दिवसांसाठी होम क्वारंटाइन केले होते. त्याच्यात कोरोना व्हायरसची कोणतीही लक्षणे नाहीत. कोणीही अफवा पसरवू नये. अनेक गावात फिरल्याने पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असल्याचे स्पष्टीकरण तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत पलंगे यांनी दिली.
तालुक्यात रंगली चर्चा - मुंबईहून बेकायदेशीरपणे स्वत:च्या गावाकडे आलेल्या त्या तरुणाला एका आठवड्यात होम क्वारंटाइन होऊनही अनेक ठिकाणी प्रवास केला म्हणून अखेर गुन्हा दाखल होऊन सरकारी खोलीत बसावे लागले आहे. तोपर्यंत माढा तालुक्यातील अनेक गावांत ही वार्ता वाºयासारखी फिरली.