सोलापूर : जिल्हा कारागृहातील सर्व न्यायाधीन कैद्यांना डॉक्टरांनी जेलमध्ये जाऊन लस दिली. पहिल्या लसीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर दुसरी लस देण्यात येणार आहे.
सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या वतीने लसीकरण मोहीम सुरू केली आहे. कारागृहात असलेल्या कैद्यांना प्रादुर्भाव होऊ नये म्हणुन गृह विभागाच्या कारागृह व सुधारसेवा विभागाच्या आदेशावरून जिल्हा कारागृहातील सर्व कैद्यांना लस देण्यात आली आहे. जिल्हा कारागृहात सध्या ३१५ न्यायाधीन कैदी आहेत. त्यात ३९ महिला आहेत. कारागृहाच्या अधीक्षकांनी शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधून कैद्यांना लस देण्याची विनंती केली होती. गेल्या २० दिवसांपूर्वी सर्वांना लस देण्यात आली आहे.
वास्तविक पाहता कारागृहात सुमारे ४५० न्यायाधीन कैदी होते. जे कैदी सात वर्षांच्या आतील शिक्षेमध्ये कारागृहात आले होते, त्यांना गृह विभागाच्या आदेशावरून कोरोनाच्या काळात तात्पुरत्या स्वरूपात सोडण्यात आले आहे. मात्र, जे न्यायाधीन कैदी सात वर्षांपेक्षा जास्त शिक्षा असलेल्या गुन्ह्यात कारागृहात आहेत, त्यांना मात्र सोडण्यात आले नाही. यामध्ये खून, खुनाचा प्रयत्न, अत्याचार यासारख्या गंभीर गुन्ह्यातील न्यायाधीन कैद्यांना मात्र सोडण्यात आले नाही. सध्या अटक झालेल्या बाहेरील कैद्यांना न्यायालयात पाठविले जात आहे. कोरोनाची तपासणी करून बाहेरून आलेल्या कैद्यांना काही दिवस वेगळ्या रूममध्ये ठेवले जाते. तरीही काळजी घेण्यासाठी सर्व न्यायाधीन कैद्यांना लस देण्यात आली आहे.
कारागृहात कैद्यांना घालावा लागतो मास्क
- सामाजिक संघटनांच्या सहकार्याने कारागृहातील न्यायाधीन कैद्यांना मास्क देण्यात आले आहेत. आतमध्ये न्यायाधीन कैदी इतरत्र फिरताना, ग्रुपमध्ये बोलताना मास्कचा वापर करतात. जेल प्रशासनाकडून तोंडावर मास्क आहे की नाही याची वारंवार पाहणी केली जाते. कोरोनाबद्दल मार्गदर्शन केले जाते. बंदिस्त वातावरणातही कारागृहाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडुन कोरोनाबाबत काळजी घेतली जाते.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या आदेशावरून कारागृहातील न्यायाधीन कैद्यांची काळजी घेतली जात आहे. महिला व पुरुष कैद्यांना पहिली लस देण्यात आली आहे. कालावधी पूर्ण झाल्यानंतर नियमाप्रमाणे त्यांना दुसरी लस दिली जाईल.
- हरिभाऊ मिंड, अधीक्षक, जिल्हा कारागृह.