वाढती लोकसंख्या व वाढत्या आरोग्य समस्या लक्षात घेऊन वडाळा येथे आरोग्य केंद्राऐवजी ग्रामीण रुग्णालयाची सुविधा दिली आहे. त्यामुळे उपचार वाढतील व नागरिकांची वडाळ्यातच उपचाराची सोय होईल असे वाटत होते. मात्र ताप, थंडी, सर्दी या आजारावरील गोळ्यांपलीकडे येथे उपचार मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. आरोग्य केंद्र असताना साधारण बाळंतपण केले जात होते. तेच आज ग्रामीण रुग्णालयात केले जाते. बालरोग तज्ज्ञांचाही अभाव आहे. असे असताना आमदार यशवंत माने यांच्या निधीतून ॲम्ब्युलन्स देण्यात आली आहे. मात्र चालक नसल्याने ती जागेवरच उभी आहे. चालक नसताना ॲम्ब्युलन्स देण्याची गरज होती का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
अगोदरच वरिष्ठ डाॅक्टर मंडळींचे उपचार करण्यावरून वाद आहेत व ते सिव्हिल सर्जनपर्यंत गेले आहेत. मात्र काही मार्ग निघाला नाही. याचा परिणाम रुग्णसेवेवर होताना दिसत आहे.
-----
पाच डाॅक्टर करतात काय?
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमासाठी पाच डाॅक्टरांची टीम कार्यरत आहे. मागील वर्षापासून कोरोनामुळे शाळा बंद असल्याने तपासणीही बंद आहे. मग ही शालेय मुले तपासणी करणारी डाॅक्टर मंडळी करतात काय, असाही सवाल विचारला जाऊ लागला आहे.
----
डाॅक्टरांच्या बदलीचा ठराव
डाॅक्टर रुग्णांना अरेरावीची भाषा वापरतात, वेळेवर उपचार करीत नाहीत, वेळ पाळत नाहीत, त्यामुळे ग्रामीण रुग्णालयातील डाॅक्टरांच्या बदलीचा ठराव वडाळा ग्रामपंचायतीने आरोग्य खात्याकडे दिला आहे. येथे सेवा मिळत नसल्याने नागरिक कळमण प्राथमिक आरोग्य केंद्राचा आधार घेतात असे ग्रामपंचायतीच्या ठरावात नमूद केले आहे.
----