सांगोला : तालुक्यात मंगळवारी दुपारनंतर मृग नक्षत्राचा तब्बल ३४८ मिमी दमदार पाऊस झाला असून सर्वात जास्त संगेवाडी १०७ तर सर्वात कमी हातीद ७ व नाझरे ११ मंडलमध्ये पाऊस झाला आहे.
महूद, संगेवाडी, शिवणे व सांगोला मंडलामधून दमदार पाऊस झाला़ शेतात पाणी साठल्याने बांध फुटून तर छोट्या मोठ्या ओढयातून पाणी वाहू लागले आहे. यंदाच्या हंगामातील रोहिणी नक्षत्रानंतर मृग नक्षत्राचा पहिलाच पाऊस दमदार झाल्याने शेतकरी वर्ग सुखावला आहे़ मृग नक्षत्राचा पाऊस खरीप हंगामाच्या पेरणीसाठी पोषक असल्याने आता शेतकºयांना जमीनीला वापसा येण्याची वाट पाहावी लागणार आह़े़.
दरम्यान, बुधवारी सकाळपासूनच आकाशात ढगाळ वातावरण अधून मधून पावसाच्या हलक्या सरी पडत होत्या. मंगळवारच्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. मंगळवारी रात्री उशिरा पर्यंत पावसाची रिपरिप चालू राहिल्याने शहरातील स्टेशन रोड, महात्मा फुले चौक, भोपळे रोड, नेहरू चौकातून पाणी वाहत असल्याचे चित्र दिसून आले़ शहरातील सर्वच गटारीही खळखळून वाहिल्या. तालुक्यातील ९ मंडळनिहाय झालेल्या पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे - सांगोला ६२, हातीद ७, नाझरे ११, महूद ४२, संगेवाडी १०७, सोनंद २३, जवळा २१, कोळा १५, शिवणे ६० असा एकूण ३४८ मिमी तर सरासरी ३८.६६ मिमी पाऊस झाला आहे.