दारू पिण्याला विरोध झाल्याने पत्नीसह मेहुणीला पेटवून दिले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:11 AM2021-01-08T05:11:41+5:302021-01-08T05:11:41+5:30
टेंभुर्णी : दारू पिण्याला विरोध केल्याचा मनात राग धरून पिता-पुत्राने मिळून पत्नीसह मेहुणीच्या अंगावर पेट्राेल ओतून पेटवून दिले. या ...
टेंभुर्णी : दारू पिण्याला विरोध केल्याचा मनात राग धरून पिता-पुत्राने मिळून पत्नीसह मेहुणीच्या अंगावर पेट्राेल ओतून पेटवून दिले. या दोघींना वाचविताना मेहुण्याची पत्नीदेखील भाजून जखमी झाली. शनिवारी घडलेल्या घटनेने चौभेपिंपरीत एकच खळबळ उडाली.
कस्तुराबाई काळे (वय ५५), पुष्पा पांडुरंग गोपने आणि कावेरी पांडुरंग लवटे अशी जखमी झालेल्या महिलांची नावे असून, त्यांच्यावर बार्शी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर टेंभुर्णी पोलिसांनी रमेश विश्वनाथ काळे व विकास रमेश काळे (रा. चौभेपिंपरी, ता. माढा) या पिता-पुत्राला अटक केली असून, २ जानेवारी रोजी रात्री आठ वाजता हा प्रकार घडला.
पोलीस सूत्राकडील माहितीनुसार, रमेश काळे व विकास काळे या दोघांना दारूचे व्यसन आहे. कंटाळलेल्या कस्तुराबाई या पती रमेश आणि मुलगा विकास या दोघांनाही मद्यप्राशनाला विरोध करीत होत्या. १५ दिवसांपूर्वी त्यांच्यात भांडण झाले. त्यानंतर कस्तुराबाई गावातच राहणारे भाऊ पांडुरंग गोपने यांच्या घरी गेल्या. शनिवारी रात्री ८ वाजता काळे पिता-पुत्र मिळून गोपने यांच्या घरी गेले. तू आम्हाला दारू पिण्यास विरोध करून शिवीगाळ का करतेस असा जाब विचारत कस्तुराबाईसोबत भांडू लागले. भांडण चालू असतानाच पती रमेश काळे याने शर्टमध्ये लपून आणलेली पेट्रोलची बाटली बाहेर काढली. कस्तुराबाई व तिची बहीण कावेरी पांडुरंग लवटे यांच्या अंगावर पेट्रोल टाकून काडीने दोघींनाही पेटवून दिले.
इतक्यात कस्तुराबाई यांच्या भावजय पुष्पा पांडुरंग गोपने या आग विझवण्यासाठी पुढे आल्या. यामध्ये त्याही भाजून जखमी झाल्या. आरडाओरडा होताच पिता-पुत्रांनी तेथून पळ काढला. जखमींपैकी पुष्पा गोपने यांची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर बार्शी येथील रुग्णालयात उपचार चालू आहेत.
याबाबत प्रथम बार्शी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आणि त्यानंतर झीरो नंबरने तो टेंभुर्णी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला. टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली.