लॉकडाऊनमध्ये हॉटेल बंद पडलं अन्‌ पेरूतून पाच लाखाचं उत्पन्न घेतलं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:23 AM2021-01-03T04:23:37+5:302021-01-03T04:23:37+5:30

कुसळंब : लॉकडाऊनमध्ये हॉटेल बंद पडलं. मात्र हार न मानता कुसळंबच्या (ता. बार्शी) इथल्या प्रभाकर शिंदे आणि नारायण ...

The hotel closed in lockdown and earned Rs 5 lakh from Peru | लॉकडाऊनमध्ये हॉटेल बंद पडलं अन्‌ पेरूतून पाच लाखाचं उत्पन्न घेतलं

लॉकडाऊनमध्ये हॉटेल बंद पडलं अन्‌ पेरूतून पाच लाखाचं उत्पन्न घेतलं

Next

कुसळंब : लॉकडाऊनमध्ये हॉटेल बंद पडलं. मात्र हार न मानता कुसळंबच्या (ता. बार्शी) इथल्या प्रभाकर शिंदे आणि नारायण शिंदे या पितापुत्रांनी अवघ्या ३५ गुंठ्यात पेरुची लागवड करून तब्बल पाच लाख रुपयांचा उत्पन्न घेतले आहे.

खरीप हंगामाने दिलेला दगा, त्यातच बोरीला भाव नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी बोरीच्या बागा उखडून टाकल्या. प्रभाकर शिंदे हेही याला अपवाद नव्हते. त्यांनीही बोरीची बाग काढून हॉटेल व्यवसाय सुरू केला. कोरोना महामारीत हॉटेल व्यवसाय बंद पडला. लॉकडाऊन काळात एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ३५ गुंठ्यांमध्ये थाई पेरूची लागवड केली. प्रभाकर शिंदे व त्यांचा मुलगा नारायण शिंदे या पितापुत्रांनी आठ महिन्यांत पाच लाख ४४ हजार रुपयाचे उत्पन्न घेतले.

अशी केली लागवड

शिंदे यांना सात एकर शेती असून, त्यापैकी पाच एकर बोर आहे व बाकी दोन एकर मुरमाड जमीन आहे. शेतीला जोड म्हणून हॉटेल व्यवसाय सुरू केला, मात्र कोरोनामुळे तोही बंद पडला. ३५ गुंठे बोर बाग काढून त्यात थाई पेरूची बाग लावण्याचे ठरविले. ४ एप्रिल २०२० रोजी इस्राइल पद्धतीने आठ बाय सहाप्रमाणे लागवड केली. त्याला ड्रीप पद्धतीने पाण्याची व्यवस्था केली. ५०० झाडे लावण्यात आली. मजुरांचा खर्च एकूण ६० हजार रुपये खर्च आला.

पेरूच्या बागेत मनुष्यबळ कमी लागते. या फळावर भुरी आणि मिलीबग रोगाची लागण होते. त्यासाठी झाडांना कॅल्शियम, पोटॅश मायकोन्युबची फवारणी करण्यात आली. त्यामुळे मजूर व फवारणीचा खर्च अत्यंत कमी होतो, असे शिंदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

स्वत:चा स्टॉल टाकून विक्री

सहा महिन्यांमध्ये झाडांना फळे येऊ लागली, तर आठव्या महिन्यांत विक्रीसाठी उपलब्ध झाली. एका झाडास २० ते २५ किलो पेरू धरले. एक पेरू कमीतकमी ५०० ते ७०० ग्रॅम वजनाचा तयार झाला. प्रभाकर शिंदे यांनी तो पाऱ्यास न देता आपणच विक्री करण्याचे ठरवले. बार्शी-लातूररोडवर त्यांच्या हॉटेलसमोर पेरू स्टॉल लावला.

पूर्ण माल विकूनच घरी जायचे

दररोज ५० किलो विक्री टोलवरून होऊ लागली. काही ६० रुपये, तर काही ५० रुपये दराने विक्री होऊ लागली. वडिलांनी शेतातून हॉटेलपर्यंत पेरू पोचवायचे आणि ते मुलांनं पूर्ण माल विकूनच मग घरी जायचे.

----

पेरूच्या लागवडीसाठी कृषी अधिकारी प्रसेनजित जानराव व प्रगतिशील शेतकरी खंडेराव लवांड यांनी मार्गदर्शन केले. तरुणांनी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीच्या मागे न लागता सुधारित पद्धतीने शेतीकडे वळावे.

- शेतकरी नारायण शिंदे

----

Web Title: The hotel closed in lockdown and earned Rs 5 lakh from Peru

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.