पंढरपूरातील बिबट्याचे रिकामे पिंजरे अजून किती बळी घेणार ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 03:36 PM2018-12-28T15:36:26+5:302018-12-28T15:39:56+5:30
पटवर्धन कुरोली : गेल्या महिनाभरापासून पंढरपूर तालुक्यातील बिबट्याचा वावर सुरू आहे़ वनविभाग याबाबत रिकामे पिंजरे लावण्याशिवाय काहीच करीत नाही़ ...
पटवर्धन कुरोली : गेल्या महिनाभरापासून पंढरपूर तालुक्यातील बिबट्याचा वावर सुरू आहे़ वनविभाग याबाबत रिकामे पिंजरे लावण्याशिवाय काहीच करीत नाही़ पटवर्धन कुरोली येथे बुधवारी सायंकाळी बिबट्या सदृश प्राण्याने ऊसतोडणी कामगारांच्या पालावर झडप घालत चार महिन्यांच्या चिमुरडीचा जीव घेतला़ त्यानंतर पुन्हा खडबडून जागे होत वनविभागाने परिसरात ठसे घेण्याची मोहीम राबविली; मात्र बिबट्याच होता का अन्य प्राणी याबाबत ते ठाम सांगू शकले नाहीत़ त्यामुळे बिबट्यासाठी लावलेले पिंजरे अजून किती दिवस रिकामे राहणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे़ शिवाय आजही परिसरात बिबट्याची दहशत कायम आहे.
पंढरपूर तालुक्यात वाखरी, गादेगाव, उपरी, पिराची कुरोली, शेळवे परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे उघड झाल्यानंतर काही प्राण्यांवर हल्ला चढला होता़ त्यानंतर अनेक प्रयत्न करूनही वनविभागाला त्याला पकडण्यात अपयश आले; मात्र तो बिबट्याच होता, हेही ते ठामपणे सांगत नाहीत़ ही संभ्रमावस्था सुरू असतानाच बुधवारी सायंकाळी ७ च्या दरम्यान पटवर्धन कुरोली येथील पाटील वस्ती शेजारी ऊस तोडणीसाठी उतरलेल्या कामगारांच्या पालावर अचानक बिबट्यासदृश प्राण्याने हल्ला केला़ चार महिन्याच्या चिमुकलीचा जीव घेत पुन्हा खळबळ उडवून दिली.
हा प्रकार राज्यभर गाजल्यानंतर गुरुवारी सकाळी वनविभाग व पोलीस पथकाने ऊस तोडणीसाठी उतरलेल्या कामगारांच्या पालाच्या आजूबाजूला असलेली शेती, नदीकडे जाणारा ओढा या परिसराची कसून पाहणी केली; मात्र बिबट्याच असल्याचे ठाम सांगण्याचे पुरावे त्यांना मिळाले नाहीत़ काही ठिकाणी पायाचे ठसे सापडले; मात्र त्यावर वनविभाग ठामपणे बोलू शकत नाही़ त्यामुळे बिबट्याच होता की बिबट्यासदृश अन्य प्राणी याबाबत ठामपणे सांगत नसल्याने नागरिकांमध्ये पुन्हा संभ्रम कायम आहे़
वनविभागाचे अधिकारी सकाळी पालावर आल्यानंतर त्यांनी मयत चिमुकलीच्या आईची व त्या पालावरील अन्य कामगारांची भेट घेऊन चर्चा केली़ त्यावेळी अधिकाºयांनी काही प्राण्यांचे छायाचित्र त्या महिलेला दाखविले़ यापैकी कोणता प्राणी आपण रात्री पाहिला, असे विचारले, तेव्हा अट्टा या महिलेने बिबट्याच होता हे ठासून सांगितले़ आम्ही आदिवासी जंगलात राहणारे, आम्हाला प्राणी कळत नाहीत का? असा प्रतिप्रश्न या ऊसतोडणी कामगारांनी अधिकाºयांना केला.
बिबट्या आगीशेजारी येत नाही, तोंडात धरलेली शिकार सोडत नाही़ असा खुलासा करीत वनविभागाच्या अधिकाºयांनी ती महिला व कामगारांचा दावा खोडून काढण्याचा प्रयत्न केला़ पालाच्या आजूबाजूच्या परिसराची पाहणी करून काही ठिकाणचे ठसे घेतले़ पोलिसांच्या मदतीने तपास करू असे राजकीय तोºयात आश्वासन देऊन ते निघून गेले; मात्र बिबट्या की बिबट्यासदृश प्राणी हे प्रश्न अनुत्तरीतच राहिले़
कारखाना व पोलीस प्रशासनाच्या भेटी
- बुधवारी बिबट्यासदृश प्राण्याने ऊसतोड कामगारांच्या पालावर हल्ला चढवित चार महिन्यांच्या चिमुकलीचा जीव घेतला़ त्यानंतर गुरुवारी पोलीस प्रशासनाकडून पंचनामे व कारखाना प्रशासनाकडून संचालक दशरथ खळगे व काही अधिकाºयांनी पालावरील कामगारांची भेट घेऊन विचारपूस केली; मात्र त्यांना आर्थिक मदत कोण देणार का याविषयी कोणीही त्यांना ठाम आश्वासन दिले नाही़
बुधवारी ऊसतोडणी कामगारांच्या पालावर बिबट्यासदृश प्राण्याने हल्ला केल्यानंतर आपण गुरुवारी त्या परिसराची पाहणी केली आहे़ बिबट्याचे ठसे आढळून आले नाहीत; मात्र काही ठिकाणी सापडलेले ठसे तपासणीसाठी पाठविले आहेत़ शिवाय मृत बाळाचा शवविच्छेदन अहवाल हातात आल्याशिवाय तो प्राणी बिबट्याच होता की अन्य कोणता याविषयी स्पष्ट सांगता येणार नाही़
- विलास पोवळे,
वनपरिक्षेत्र अधिकारी
ऊस तोडणीसाठी आलेल्या कामगारांचा संबंधित कारखान्याकडून विमा उतरविला जातो़ या टोळीतील ही महिला व तिच्या जुळ्यांचा विमा उतरविला असल्यास कारखान्याच्या माध्यमातून आवश्यक आर्थिक मदत देता येईल का याबाबत आपण चेअरमन आ़ भारत भालके व प्रशासनाशी चर्चा करून ती मदत देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू़
- उत्तमराव नाईकनवरे,
संचालक, विठ्ठलराव कारखाना