माणुसकी; पद्मावतीतार्इंच्या अंत्यसंस्कारासाठी सरसावले भाईजान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2020 12:30 PM2020-06-05T12:30:37+5:302020-06-05T12:42:25+5:30

निसर्गाने निर्माण केलेला माणुसकी हा एकच धर्म; मुला-मुलींनी व्हिडिओ कॉलवरून घेतले आईचे दर्शन

Humanity; Sarsavale Bhaijan for the funeral of Padmavati | माणुसकी; पद्मावतीतार्इंच्या अंत्यसंस्कारासाठी सरसावले भाईजान

माणुसकी; पद्मावतीतार्इंच्या अंत्यसंस्कारासाठी सरसावले भाईजान

googlenewsNext
ठळक मुद्देसिद्धेश्वर नगर येथे राहणारे जावई यशवंत बळवंत कुलकर्णी यांच्या घरात सध्या पद्मावती नारायण कुलकर्णी (वय ८५) या राहत होत्यावृद्धापकाळाने त्यांचा गुरुवारी पहाटे दोन वाजता मृत्यू झालाआईचे निधन झाल्याचे ऐकून मुलांची झोप उडाली, अश्रूंचा बांध फुटला

संताजी शिंदे

सोलापूर : सोलापुरात नातेवाईक नसलेल्या वृद्ध पद्मावतींचा गुरुवारी जावयाच्या घरी मृत्यू झाला. सध्याच्या जिल्हाबंदीमुळे बाहेरच्या नातेवाईकांना सोलापुरात येणे शक्य नव्हते. घरात केवळ दोन माणसे होती. अशा परिस्थितीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार कसे होणार, अशी चिंता पद्मावतींच्या आप्तांना लागलेली असताना सिद्धेश्वर नगरातील भाईजान त्यांच्या मदतीला धावले अन् अंत्यसंस्कार केले. निसर्गाने निर्माण केलेला माणुसकी हा एकच धर्म असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले.

सिद्धेश्वर नगर येथे राहणारे जावई यशवंत बळवंत कुलकर्णी यांच्या घरात सध्या पद्मावती नारायण कुलकर्णी (वय ८५) या राहत होत्या. वृद्धापकाळाने त्यांचा गुरुवारी पहाटे दोन वाजता मृत्यू झाला. सासूबाई पद्मावती कुलकर्णी यांचे निधन झाल्याचे लक्षात आल्यानंतर जावयाने तत्काळ बंगळुरू, पुणे, संगमनेर, अहमदाबाद येथील मुलांना व विजयपूर येथील मुलीला फोन करून माहिती दिली. 

आईचे निधन झाल्याचे ऐकून मुलांची झोप उडाली, अश्रूंचा बांध फुटला. मात्र, सध्या असलेल्या कोरोनाच्या संचारबंदीमुळे त्यांना तत्काळ सोलापूरला येणे शक्य नव्हते. जावई यशवंत कुलकर्णी यांच्या घरात फक्त दोन माणसे व हत्तुरे वस्ती येथील एक चुलतभाऊ असे चार जण होते. त्यामुळे ते स्थानिक नगरसेवक बाबा मिस्त्री यांच्याकडे पहाटे तीन वाजता गेले. घडलेला प्रकार सांगितला, अंत्यविधी कसा करू असा प्रश्न  केला. 

बाबा मिस्त्री यांनी सकाळी मी येतो काळजी करू नका, अंत्यविधी व्यवस्थित पार पाडू, असे आश्वासन दिले. सकाळी ११ वाजता नगरसेवक बाबा मिस्त्री हे सिद्धेश्वर नगरात गेले. त्या ठिकाणी १४ बांधव जमा झाले. रितीरिवाजाप्रमाणे अंत्यविधीची तयारी केली. हार आणून अंत्ययात्रेची ताटी तयार केली. ‘श्रीराम जय राम... जय जय राम...’चा उच्चार सुरू झाला आणि त्या परिसरात राहणाºया ‘भाईजान’ बांधवांनी खांदा देत काही अंतरापर्यंत अंत्ययात्रा नेली. पुढे महापालिकेच्या गाडीत मृतदेह ठेवून सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या शेजारी असलेल्या स्मशानभूमीत विधिवत पद्धतीने पद्मावती कुलकर्णी यांच्यावर अंत्यसंस्कार केले. 

मुला-मुलींनी व्हिडिओ कॉलवरून घेतले दर्शन
- पद्मावती कुलकर्णी यांना चार मुले व एक मुलगी आहे. त्या सध्या जावई यशवंत कुलकर्णी यांच्या घरी राहत होत्या. मात्र, येथील मुलीचा यापूर्वीच मृत्यू झाला आहे. बंगळुरू, पुणे, संगमनेर, अहमदाबाद येथील मुलांना व विजयपूर येथील मुलीला व्हिडिओ कॉलद्वारे संपूर्ण मयत व शेवटचे अंत्यदर्शन घडवण्यात आले. घरी बसून मुले आपल्या आईचा अंत्यविधी पाहत होता. या सर्व नातेवाईकांनी या परिसरातील सर्व बांधवांचे आभार मानले.

यशवंत कुलकर्णी यांना अंत्यविधीचा प्रश्न पडला होता. मात्र, आम्ही त्यांना धीर दिला. आम्ही तुमचे नातेवाईक आहोत असे समजा, काळजी करू नका, असे सांगून परत पाठवले. सकाळी जाऊन तयारी केली आणि अंत्यविधी पार पाडला. मुला-मुलींनी फोन करून आभार मानले, पण हा माणुसकीचा धर्म आहे. 
- बाबा मिस्त्री, नगरसेवक. 

Web Title: Humanity; Sarsavale Bhaijan for the funeral of Padmavati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.