फोटो व्हायरल करण्याची घाईगडबड
माऊलींचं दर्शन घ्यायचंच राहिलं
कोरोना महामारीमुळे विविध संतांच्या पालख्या यंदाही बसने पांडुरंगाच्या भेटीला गेल्या. या पालख्या जात असताना रस्त्यालगत शेकडो भाविकांनी नतमस्तक होत दर्शन घेतले. यामध्ये तरुणाईपासून ते आबालवृद्धांचा समावेश होता. संतांची पालखी जाणाऱ्या बसकडे सारेच कुतूहलाने पाहत होते. माळशिरस शहरात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे बसद्वारे आगमन होताच अनेकांनी हात जोडले. तरुणाई मात्र आपले मोबाइल काढून शूटिंगमध्ये व्यस्त होती. मोबाइलच्या माध्यमातून बसचे चित्रीकरण पूर्ण होताच पुढे फॉरवर्ड करण्यासाठी त्यांची धडपड दिसली. अनेक ग्रुपमध्ये पालखी माळशिरसमध्ये आल्याचे फोटो झपाट्याने व्हायरल झाले. पालखी पुढे गेल्यानंतर या तरुणाईच्या चर्चेदरम्यान अचानक त्यांच्या ध्यानात एक गोष्ट आली. फोटो काढले... व्हायरल झाले... पण गड्यांनो, या घाईगडबडीत माऊलींच्या पालखीचे दर्शन घ्यायचेच राहून गेले! आणि मग नकळत एकाने हात जोडले अन् “पांडुरंगा, माफ कर.. दर्शन घ्यायचे राहून गेले.”
---
मोडनिंबकरांनो, टायमाला बंद करा.. नवीन साहेब येणार आहेत!
सध्या कोरोनाची वाढती रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी राज्य शासनाने प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना आपापल्या जिल्ह्यातील परिस्थितीनुसार नियम घालून दिलेले आहेत. माढा तालुक्यातील मोडनिंब या गावामध्ये सकाळी सात ते दुपारी चार वाजेपर्यंत व्यवसाय सुरू आहेत. हॉस्पिटल व मेडिकल वगळता जिल्हाधिकाऱ्यांच्या नियमात बसणारे सर्व व्यवसाय शासन नियमानुसार सुरू होते. वेळेचे बंधन राहावे म्हणून दुपारी चार वाजल्यानंतर व्यवसाय बंद करावेत यासाठी सायरन वाजवला जात असे. तरीही अनेक व्यावसायिक व्यवसाय चालूच ठेवत होते. बुधवारी टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे नूतन सहायक पोलीस निरीक्षक मोडनिंबला येणार असल्याची कुजबुज खबऱ्यामार्फत लागली. लगेच प्रत्येक व्यावसायिक एकमेकांना फोन करून सांगू लागले, “टायमाला बंद करा. साहेबाची गाडी येणार आहे.”
नियुक्ती डीवायएसपींची, कामे करावी लागतात पीआयची...
मंगळवेढ्यात काही महिन्यांपूर्वी डीवायएसपी राजश्री पाटील यांनी रुजू होऊन पदभार स्वीकारला. मंगळवेढा, सांगोला या दोन तालुक्यांची जबाबदारी त्यांच्यावर आहे. त्यांचा उत्साह दांडगा आहे. यामुळे त्यांना अवैध व्यवसायाची माहितीही मिळते व कारवाईही केली जाते. दोन्ही तालुक्यांत पोलीस निरीक्षकांपूर्वी त्यांना माहिती मिळालेली असते नंतर इतरांना ती कळते, असे दिसून आले आहे. गेल्या दोन महिन्यांपूर्वी एका सहायक पोलीस निरीक्षकाने होलसेल गुटखा व्यावसायिकाला दम देऊन “तू मला फक्त जेवणावर भागवतो, तुला बघतोच,” अशी पोलीस ठाण्यात तंबी दिली होती. याबाबत माध्यमात वृत्त आल्याने त्या अधिकाऱ्याची घाबरून पार ढेरी कमी झाली होती. यानिमित्ताने अधिकाऱ्यांतील संघर्ष चव्हाट्यावर आला होता. निम्न दर्जाच्या अधिकाऱ्यांमधील संघर्ष समोर आला असताना वरिष्ठ दर्जाचे अधिकारी काम करताना दिसत आहेत. त्यामुळे कोणाचे नेमके काय काम आहे, हेच लोकांना कळेनासे झाले आहे.