क्षुल्लक कारणासाठी रेल्वेतील चेन ओढाल तर दंड अन् कारावासाची शिक्षा !
By Appasaheb.patil | Published: September 22, 2022 12:43 PM2022-09-22T12:43:19+5:302022-09-22T12:43:25+5:30
प्रवाशांनो सावधान; विनाकारण चेन ओढणे धोकादायक
आप्पासाहेब पाटील
सोलापूर : क्षुल्लक कारणांसाठी साखळी ओढून रेल्वे गाडी थांबविण्याचे प्रकार नेहमीच घडतात; मात्र अशा प्रकारे विनाकारण साखळी ओढणे रेल्वे कायद्यानुसार गुन्हा असून संबंधिताला कारावास तसेच दंड होऊ शकतो. शक्यतो प्रवाशांनी साखळी ओढण्यापेक्षा हेल्पलाईन नंबर व गाडीत असलेल्या रेल्वे सुरक्षा बल व लोहमार्ग पोलिसांची मदत घ्यावी असेही आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
मध्य रेल्वेच्यासोलापूर विभागातून दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. नोकरी, शिक्षण व इतर कामासाठी जाणाऱ्या लोकांपासून ते पर्यटनासाठी जाणारे सर्व जणच रेल्वेने प्रवास करतात. एखादवेळी मुले, वृद्ध यांना गाडीत चढताना अडचणी येऊ शकतात. कधी ते चढण्याआधीच गाडी सुरू झालेली असू शकते. अशी परिस्थिती उद्भवल्यास साखळीचा उपयोग करता येऊ शकतो. त्यासाठी प्रत्येक कोचमध्ये साखळी दिली असते. ती ओढून गाडी थांबवता येते.
---------
चेन ओढल्यानंतर पुढे काय होते जाणून घ्या
साखळी ओढल्यावर गाडीचा वेग हळूहळू कमी होतो व मग काही अंतर जाऊन गाडी थांबते. त्यामुळे गाडीची ८ ते १२ चाके प्रभावित होतात. एका बोगीला ८ चाके असतात. या ८ चाकांवर थेट प्रभाव पडतो याशिवाय मागील बोगीच्या पुढील चार चाकांवरही साखळी ओढण्याचा परिणाम होतो. त्यामुळे अपघातांची शक्यता उदभवते, त्यामुळे शक्यतो साखळी ओढण्यापेक्षा हेल्पलाईन किंवा रेल्वे पोलिसांना कळवावे असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
-----------
प्रवाशांनो याठिकाणी मागा मदत
वेगातील गाडीत साखळी ओढल्यास मोठा अपघात होऊ शकतो. सुदैवाने साखळी ओढल्यामुळे आजवर रेल्वेचा अपघात झालेला नाही. मात्र १९८८ साली फ्रान्समध्ये झालेल्या अपघातात ५६ जणांना जीव गमवावा लागला होता. प्रत्येक बाबीसाठी साखळी ओढण्याची गरज नाही. गाडीतील टीटीई, आरपीएफ, लोहमार्ग पोलिसांना माहिती देता येऊ शकते. आरपीएफचा १३९ हा हेल्पलाइन क्रमांक आहे. जीआरपीच्या १५१२ या क्रमांकावरही फोन करता येतो. यापैकी कुठेही मदत मागता येऊ शकते.
-----------
प्रवाशांना वेळेत पोहोचविणे ही रेल्वेची जबाबदारी आहे; मात्र साखळी ओढण्यामुळे रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक बिघडते. त्याचा फटका शेवटी प्रवाशांनाच बसतो. त्यामुळे विनाकारण साखळी ओढू नये व रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे. अन्यथा रेल्वेच्या नियमानुसार कारवाई होऊ शकते.
- अमोल गवळी, सहायक पोलीस निरीक्षक, लोहमार्ग पोलीस, सोलापूर
------------
या कारणासाठी ओढतात प्रवासी चेन
साखळी ओढण्याच्या नियमांबाबत प्रवाशांना माहिती नसल्याने अनेकदा अन्य कारणांसाठीही साखळी ओढली जाते. कधी मोबाईल पडला म्हणून साखळी ओढण्याचे प्रकार घडतात; मात्र ते चुकीचे आहे. शिवाय मौल्यवान वस्तू पडल्यास, वैद्यकीय मदत, अपघाताची सूचना, भांडण लागल्यास प्रवासी चेन ओढतात.