निवडून यायचे असेल तर शिंदे यांनी माझ्याकडे यावे; आडम मास्तर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 10:18 AM2019-03-11T10:18:02+5:302019-03-11T10:18:31+5:30
पराभवाचा धोका टाळण्यासाठी सुशीलकुमार शिंदे लोकांच्या लग्नाला, बारशाला जात आहेत, त्याऐवजी त्यांनी माझ्याकडे यावे ... - आडम मास्तर
राजकुमार सारोळे
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रात माकप काँग्रेस आघाडीबरोबर जात आहे, पण सोलापुरात माकपचे आडम मास्तर आक्रमक झाले आहेत. अशात पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्री फडणवीस यांचे कौतुक केले म्हणून पक्षाने त्यांना केंद्रीय कमिटीतून तीन महिन्यांसाठी निलंबित केले आहे, या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी केलेली ही बातचित.
प्रश्न : मास्तर, तुम्ही ५२ वर्षे माकपमध्ये राहून निष्ठेने काम केलेले असताना ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षाने कमिटीतून निलंबित केले, याबद्दल काय वाटते.
उत्तर : पक्षाने माझ्यावर केलेली कारवाई योग्य आहे. लोकसभा निवडणूक तोंडावर असताना मी भाजपने आयोजित केलेल्या विकासकामांच्या शुभारंभ व्यासपीठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे केलेले कौतुकाचे शब्द अनावधानाने आले. यामुळे पक्षाच्या प्रतिमेला धोका पोहोचू शकतो. निवडणुकीत भाजपवाले माझ्या मुद्याचा फायदा घेऊ शकतात. मी असे कौतुक करायला नको होते.
प्रश्न : पक्षाच्या कारवाईनंतर आता तुमची भूमिका काय आहे.
उत्तर : पक्षाने मला तीन महिन्यांसाठी केंद्रीय कमिटीतून निलंबित केले आहे. देशातून असे १0५ तर महाराष्ट्रातून चार जण आहोत. केंद्रीय बैठकांना मला उपस्थित राहता येणार नाही, पण लोकसभा निवडणुकीचे कामकाज पाहण्याची जबाबदारी कायम आहे. या कारवाईनंतर मलाही पश्चाताप होतोय, देशभरातून फोन आले. पण आता नाईलाज आहे.
प्रश्न : लोकसभेसाठी भूमिका काय असणार आहे.
उत्तर : केंद्रामध्ये काँग्रेसबरोबर आघाडी झाली तरी सोलापुरात आमचे जमलेले नाही. मी शहर मध्यची जागा मागितली आहे. पण काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे मुलगी आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रेमाखातर ही जागा सोडण्यास तयार नाहीत. त्यामुळे त्यांना याची किंमत मोजावी लागेल. एमआयएम व बहुजन वंचित आघाडी असल्याने याचा फटका बसणार आहे. त्यामुळे शिंदे यांची स्थिती इकडे आड तिकडे विहीर अशी आहे.
४२0 मी अजून विसरलो नाही
आमदार प्रणिती शिंदे यांनी १४ डिसेंबर २0१४ रोजी कलेक्टर कचेरीवर मोर्चा काढून माझ्यावर ४२0 चा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. सुटी असताना कलेक्टरला आॅफिसला बोलावून घेतले होते, हे मी विसरलेलो नाही. एकीकडे गरिबांसाठी काम करतो असे दाखवून घरकुलास खोडा घातला.
मुलीचे प्रेम बाजूला ठेवावे!
लोकसभेवर निवडून यायचे असेल तर सुशीलकुमार शिंदे यांनीच विचार करावा व माझ्या घरी यावे. निवडून येण्याची चिंता त्यांनी माझ्यावर सोडावी. शिंदे लोकांच्या लग्नाला, बारशाला जात आहेत, त्यापेक्षा माझ्याकडे आले तर मोठी ताकद मिळेल. मुलीचे प्रेम त्यांनी थोडे बाजूला ठेवावे. मी ही बाब राहुल गांधी व सीताराम येचुरी यांच्या कानावर घातली आहे. भाजपला सत्तेपासून रोखणे हा आमचाही उद्देश आहे. भाजप फॅसिस्ट राजवट आणून पाहत आहे, अशात भाजप पुन्हा सत्तेवर आले तर मात्र पुढील निवडणुका विसराव्या लागतील.