बेकायदेशीर चिमणी पाडा, सोलापूर पालिकेचे पत्र पुन्हा सिध्देश्वर कारखान्यावर धडकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2021 03:00 PM2021-11-18T15:00:57+5:302021-11-18T15:01:03+5:30
बेकायदेशी चिमणी प्रकरण : पुन्हा दिली सात दिवसांची मुदत
साेलापूर : विमानसेवेस अडथळा ठरणारी बेकायदेशीर चिमणी सात दिवसांच्या आत पाडून टाका, अन्यथा महापालिकेचे मक्तेदार पाडकाम हाती घेतील, असे पत्र महापालिकेच्या नगररचना कार्यालयाचे साहाय्यक संचालक माेरेश्वर सुगडे यांनी सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन धर्मराज काडादी यांना बुधवारी पाठविले. यापूर्वीही पालिकेने तीन वेळा अशी पत्रे दिली हाेती.
महापालिकेने सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची बेकायदेशीर चिमणी पाडण्यासाठी मक्तेदार नेमला आहे. यादरम्यान, कारखान्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून कारवाईला स्थगिती देण्याची मागणी केली हाेती. त्यानुसार नगरविकास खात्याने विधी व न्याय विभागाचा अहवाल येईपर्यंत कारवाई स्थगित ठेवा, असे कळविले हाेते. नगरविकास खात्याने मंगळवारी ही स्थगिती उठविली. पालिकेने त्वरित पाडकामाची कारवाई करावी, असे सांगितले. त्यानुसार नगररचना कार्यालयाने बुधवारी कारखान्याला पत्र पाठविले. बुधवार, २४ नाेव्हेंबरपर्यंत पाडकाम करावे, अन्यथा पालिकेचे मक्तेदार पाडकाम हाती घेतील. पाडकामाचा खर्च आणि त्यावरील सुपरव्हिजन खर्चही कारखान्याला द्यावा लागेल, असे नगररचना प्रमुख सुगडे यांनी कळविले आहे.
--
सात दिवसांच्या मुदतीचे तिसरे पत्र
पालिकेने यापूर्वी २०१६ मध्ये कारवाई हाती घेतली. प्रथम सात दिवसांच्या मुदतीचे पत्र पाठविले. नंतर कारवाई सुरू केली. शेतकऱ्यांचा विराेध आणि तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर कारवाई थांबली. २०१९ मध्ये पालिका आणि जिल्हा प्रशासनाकडून चिमणी हटविण्याचे पत्र देण्यात आले. कारखान्याने न्यायालयातून स्थगिती मिळविली. आता नाेव्हेंबर २०२१ मध्ये पुन्हा सात दिवसांच्या आत चिमणी पाडा म्हणून पत्र पाठविले आहे. सात दिवसांच्या मुदतीचे हे तिसरे पत्र आहे.
----
चार टाॅवरवर यापूर्वीच कारवाई
हाेटगी राेड विमानतळावरून विमानसेवा सुरू करण्यास सिद्धेश्वरच्या चिमणीसह चार माेबाइल टाॅवर आणि काही इमारतींचा समावेश हाेता. चारही टाॅवरची उंची कमी करण्यात आली. बांधकामांची उंची कमी करण्यात आल्याचे पालिकेचे साहाय्यक अभियंता शांताराम आवताडे यांनी ‘लाेकमत’ला सांगितले.
---