आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांना शस्त्रक्रियांचे प्रशिक्षण देऊन त्यांचा वापर भारतातील रुग्णांवर स्वतंत्रपणे करण्याची परवानगी देण्यात येणार आहे. सीसीआयएम (सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन)ने केलेल्या दाव्यानुसार या शस्त्रक्रिया आधुनिक वैद्यकातील (अॅलोपॅथिक) नसून आयुर्वेदिक आहेत. अॅलोपॅथीमध्ये सर्जन होण्याआधी विविध विषयांचा सखोल अभ्यास करावा लागतो. आयुर्वेदिक विद्यार्थ्यांना आधुनिक वैद्यकाचे शिक्षण देणे आणि वरवरचे तंत्र शिकवून शस्त्रक्रियेस परवानगी देणे धोक्याचे ठरू शकते, अशी भूमिका आयएमएतर्फे घेण्यात आली आहे.
सीसीआयएमने या सर्जिकल प्रक्रियेविषयीची सूचना मागे घ्यावी, मिक्सोपॅथी (मिश्रचिकित्सा पद्धती)ला प्रोत्साहन देण्याच्या विचारात असलेल्या राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या समित्या बरखास्त कराव्यात, सरकारने सर्वप्रकारच्या वैद्यकीय शाखांमध्ये संशोधन कार्याला प्रोत्साहन द्यावे, या मागण्यांसाठी आयएमए आंदोलन करत आहे.
-------
कोविड आणि अत्यावश्यक सेवा सुरूच राहणार
आयएमए सोलापूर शाखेतर्फे आठ डिसेंबर रोजी सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात येणार आहेत. डफरिन चौक येथील कार्यालयासमोर हे आंदोलन होणार आहे. तसेच ११ डिसेंबर रोजी बंद पुकारण्यात येणार आहे. या दिवशी सायंकाळी सहा वाजेपर्यंत ओपीडी बंद ठेवण्यात येणार असून, त्यानंतरच ओपीडी सुरू करण्यात येणार आहे. बंददरम्यान कोविड आणि अत्यावश्यक वैद्यकीय सेवा सुरूच राहणार आहेत.
केंद्र सरकाने ५८ प्रकारच्या विविध शस्त्रक्रिया करण्यास आयुर्वेद डॉक्टरांना परवानगी दिली आहे. या पद्धतीने परवानगी देणे चुकीचे आहे. मॉडर्न मेडिसिनच्या अंतर्गत ज्या शस्त्रक्रिया येतात त्या दुसऱ्या शाखेच्या डॉक्टरांनी करू नयेत. यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे.
- डॉ. हरीश रायचूर, अध्यक्ष आयएमए, सोलापूर