दुष्काळाला कंटाळून युवकाची आत्महत्या, नंदेश्वर येथील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2018 12:44 PM2018-11-04T12:44:12+5:302018-11-04T12:47:46+5:30
दुष्काळाचा बळी ; मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
नंदेश्वर : पडोळकरवाडी येथील किसन नामदेव लांडगे वय 35 या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज 4 नोव्हेंबर रोजी सकाळी सहा वाजता उघडकीस आली असून याबाबत मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना नंदेश्वर ता .मंगळवेढा येथे घडली आहे.
याबाबत पोलिस सुत्राकडून मिळालेली माहिती अशी की किसन नामदेव लांडगे हा 2 नोव्हेंबर रोजी नंदेश्वर ता. मंगळवेढा येथील आपल्या बहिणीकडे जाऊन येतो असे सांगून घरापासून आला होता. सतत दुष्काळामुळे तो ग्रासला होता. लांडगे यांचे कुटुंब शेतीत उत्पादन येत नसल्याने मोलमजुरी करून आपल्या पोटाची उपजीविका भागवीत होते. कायमच दुष्काळामुळे कंटाळला असल्याचे सतत तो बडबड करीत होता असे त्याचे वडील नामदेव लांडगे यांनी पोलीस फिर्यादीत म्हटले आहे. 4 नोव्हेंबर 2018 रोजी नंदेश्वर येथील महादेव दोलतडे यांच्या शेतालगत लिंबाच्या झाडाला गळफास घेतल्याचे दिसून आल्यामुळे सदरची घटना येथील नातेवाईकांनी आत्महत्याग्रस्त किसन लांडगे यांच्या वडिलांना कळवली. त्यानंतर त्यांनी गावातील भावकीतील मंडळी यांना सोबत घेऊन नंदेश्वर येथे आले असता गळफास घेतल्याचे दिसून आले त्यांनी लागलीच याबाबतची फिर्याद मंगळवेढा पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक महेश विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक घोगडे करीत आहेत.