दक्षिण सोलापूर : तालुक्यात कोविड पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून बुधवारी एकाच दिवशी ५३ रुग्ण आढळले. एनटीपीसीमध्ये सुरू झालेला कोरोनाचा कहर संपता संपेना. लक्षणे जाणवू लागल्याने ६३ जणांना उपचारासाठी सोलापूरच्या विविध रुग्णालयांत दाखल करण्यात आले.
दक्षिण सोलापूर तालुक्यात एप्रिल महिन्यापासून रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. अंत्रोळी, एनटीपीसी, विडी घरकुल, भंडारकवठे, माळकवठे या गावात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या अधिक दिसून येते. विशेषतः एनटीपीसीमध्ये दररोज चाचण्या केल्या जात आहेत. चाचण्यांची संख्या अधिक असल्याने रोज १० पेक्षा अधिक रुग्ण आढळून येत आहेत. ही संख्या तालुक्यातील गावांमध्ये सर्वाधिक आहे. त्याखालोखाल अंत्रोळीमध्ये रुग्णांची संख्या दिसून येते. गुरुवारी अंत्रोळीमध्ये ९ तर एनटीपीसीमध्ये १२ रुग्ण आढळले. दरम्यान, तीव्र लक्षणे जाणवल्याने ६३ जणांना सोलापूरच्या विविध रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे.
-----
अशी आहे कोरोना रुग्णांची स्थिती
प्रगतीपर अहवाल : २८०४
पॉझिटिव्ह अहवाल : ५६
मृत्यू : ५
घरी गेलेले : ३४
आतापर्यंत बरे झालेले : २३४९
उपचार चालू असलेले : ३६१
------
लसीकरण संथ गतीने
आठवडाभरात लसीकरणाची मागणी वाढत आहे. प्रशासनाकडून लसींचे डोस उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागात असंतोष आहे. लस तातडीने उपलब्ध व्हावी, शहरातील नागरिकांची व्यवस्था शहरात करावी. ग्रामीण भागासाठी कोठा वाढवून मिळावा, अशी मागणी जोर धरत आहे.
-------
प्रशासन कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी कसोशीने प्रयत्न करीत आहे. कोविड केअर सेंटरची संख्या, बेडची संख्या वाढवण्यासाठी मी स्वतः तहसीलदार अमोल कुंभार, उज्ज्वला सोरटे, तालुका आरोग्याधिकारी दिगंबर गायकवाड, सेवाभावी संस्था, कारखाने यांच्याशी संपर्क करीत आहे.
- राहुल देसाई, गटविकास अधिकारी,
पंचायत समिती, दक्षिण सोलापूर